सरोगसी विधेयक संसदेत अडवणार
By admin | Published: August 27, 2016 04:30 AM2016-08-27T04:30:28+5:302016-08-27T04:30:28+5:30
भाडोत्री गर्भाशयाबाबतचा कायदा आणण्यास काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, केंद्राने याबाबत फेरविचार करावा
नवी दिल्ली : भाडोत्री गर्भाशयाबाबतचा कायदा आणण्यास काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, केंद्राने याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. काँग्रेस हे विधेयक संसदेत संमत होऊ देणार नाही, असे संकेत मिळाले आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज संमत केलेल्या विधेयकाच्या मसुद्यावर प्रश्नचिन्ह लावताना काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, सरकार २१ व्या शतकात सदोष कायदा आणत आहे. मंत्रिमंडळाने संमत केलेला हा मसुदा खुद्द सरकार आणि भाजपच्याच अनेक नेत्यांना मान्य नाही. २०१० मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने तयार केलेला मसुदा सर्व अंगांनी व्यापक होता. मात्र, मोदी सरकारने या मसुद्याला संकुचित केले आहे. हे विधेयक मध्ययुगीन मानसिकतेतून आणल्याचा आरोप त्यांनी केला. (लोकमत न्यूज
नेटवर्क)
>...तर भाडोत्री गर्भाशयाचा लाभ मोजक्या लोकांनाच
काँग्रेसशिवाय इतरांकडूनही या विधेयकाला विरोध होऊ लागला असून, मसुद्यात व्यापक बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मसुद्यातील तरतुदीनुसार भाडोत्री गर्भाशयाचा लाभ मोजक्या लोकांनाच मिळू शकणार आहे. तुमच्या विवाहाला पाच वर्षे झाली असतील, तर हा कायदा लाभदायक ठरेल; परंतु लग्नाला पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तुम्हाला भाडोत्री गर्भाशयाद्वारे मूल जन्माला घालायचे असेल, तर हा कायदा तुम्हाला तसे करू देणार नाही.