सरसंघचालक मोहन भागवत खायचे मांसाहारी पदार्थ
By admin | Published: July 22, 2015 11:45 AM2015-07-22T11:45:33+5:302015-07-22T11:51:56+5:30
आयआयटी रुडकी येथील कँटिनमध्ये मांसाहारी पदार्थ देण्याच्या कृतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकात हिंदूविरोधी म्हटले असतानाच संघाने मात्र या मताशी असमहती दर्शवली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - आयआयटी रुडकी येथील कँटिनमध्ये मांसाहारी पदार्थ देण्याच्या कृतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकात हिंदूविरोधी म्हटले असतानाच या मुद्द्यावर संघही बुचकळ्यात पडले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे या पदावर विराजमान होण्यापूर्वी स्वतः आवडीने मांसाहारी पदार्थ खायचे अशी आठवण संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी मांडली असून संघातील अनेकांनी या भूमिकेला विरोध दर्शवल्याचे समजते.
संघाच्या ऑर्गनायझर या मासिकात आयआयटी रुडकीच्या कँटीनमध्ये मांसाहारी पदार्थ देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. कँटिनमध्ये मांसाहारी पदार्थ देणे ही हिंदूविरोधी कृती असल्याचे या लेखात म्हटले होते. मात्र संघाची भूमिका या लेखाशी विसंगत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. संघावर ४२ पुस्तकं लिहीणारे दिलीप देवधर म्हणतात, मोहन भागवत २००९ मध्ये सरसंघचालक बनण्यापूर्वी ते स्वत: आवडीने मांसाहारी पदार्थ खायचे. संघाचे असंख्य प्रचारक मांसाहारी पदार्थ खातात व यात हिंदूविरोधी हा मुद्दाच येत नाही. संघात मांसाहारी पदार्थ खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. पण मुख्यालयातील कार्यक्रमांमध्ये मांसाहारी पदार्त कधीच ठेवले जात नाही, तुम्ही मुख्यालयाबाहेर किंवा स्वतःच्या घरी मांसाहारी पदार्थ खाऊ शकता असे दिलीप देवधर यांचे म्हणणे आहे. संघाने फक्त गोमांसाचा विरोध दर्शवला आहे असेही त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी मासिक हे संघाचे मुखपत्र नसल्याचे स्पष्ट केले. त्या लेखात मांडलेले विचार हे संघाचे विचार नव्हते. आम्हाला अनेकांनी या लेखाविरोधातील प्रतिक्रिया कळवल्या आहेत. पुढील अंकात आम्ही त्यादेखील प्रकाशित करु असे केतकर यांनी स्पष्ट केले.