सरसंघचालक मुस्लिमांबाबत मवाळ, आता नुपूर शर्मांचं निलंबन, भाजपाचा अजेंडा बदलतोय? मिळताहेत असे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 10:24 PM2022-06-05T22:24:57+5:302022-06-05T22:25:27+5:30
BJP's Policy About Muslims: मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं निलंबन केलं. तर नुकतीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांना विरोध नसल्याचे सांगतानाच ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
नवी दिल्ली - भाजपाने आज एक मोठा निर्णय घेताना मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं निलंबन केलं. तसेच दिल्ली भाजपाचे प्रवक्ते नवीनकुमार जिंदल यांनाही पक्षातून बाहेरची वाट दाखवली. तर नुकतीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांना विरोध नसल्याचे सांगतानाच ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान, या दोन घटनांमुळे भाजपाचा अजेंडा बदलतोय की काय, अशा चर्चांना उधाण आले आहे.
आज पक्षाच्या दोन नेत्यांवर होणाऱ्या कारवाईचे संकेत भाजपाने आपल्या स्पष्टीकरणाद्वारे काही तासांपूर्वीच दिले होते. भाजपाने आपण सर्व धर्मांचा सन्मान करत असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच पक्ष कुठल्याही धर्माशी निगडित व्यक्तिमत्त्वाच्या अपमानाचा निषेध करतो. भाजपा कुठलाही धर्म किंवा वर्गाचा अपमान किंवा त्याला बदनाम करणाऱ्या विचारसरणीविरोधात आहे, असेही या पत्रकामधून स्पष्ट करण्यात आले. भाजपा सर्वपंथ संप्रदायांचा सन्मान करतो. तसेच कुठल्याही धर्मातील पूजनीय महात्म्यांचा अपमान करत नाही. दरम्यान, भाजपाच्या शिस्तपालन समितीने नोटिस पाठवल्यानंतर आज संध्याकाळी चौकशी पूर्ण होपर्यंत नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे. तर नवीन जिंदल यांना पक्षातून बाहेरची वाट दाखवली.
दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणामुळे सध्या देशातील राजकारण पेटलेले आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी सांगितले की, ज्ञानवापी विवादामध्ये आस्थेचे काही मुद्दे आहेत. मात्र त्यावर कोर्टाकडून येणारा निर्णय हा सर्वमान्य असला पाहिजे. प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग शोधून रोज एक नवा वाद निर्माण करण्याची गरज नाही, असा टोलाही मोहन भागवत यांनी लगावला होता.
२८ मे रोजी एका टीव्ही डिबेटमध्ये नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून वादाला तोंड फुटले होते. तसेच शुक्रवारी कानपूरमध्ये झालेल्या दंगलीमागे तेच कारण असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, कुवैत, दुबई, सौदी अरेबिया येथेही नुपूर शर्मांनी केलेल्या टिप्पणीला विरोध झाला होता. तसेच भारतीय सामानावर बहिष्कार घालण्यास सुरुवात झाली होती.
दरम्यान, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितले की, दोन्ही प्रवक्त्यांवर कारवाई करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संदेश दिला आहे की, ते चूक झाल्यास आपला परका असा भेदभाव करत नाहीत. दोन्ही प्रवक्ते विरोधकांच्या जाळ्यात अडकले. मोदी नेहमी सांगतात की विकासवादी राजकारणाला पराभूत करण्यासाठी विरोधक अशी जाळी टाकतील. मात्र या नेत्यांनी ती खबरदारी घेतली नाही.