संत निरंकारी मिशनच्या माता सरविंदर कालवश, सदगुरुपदी सुदीक्षा महाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 02:40 PM2018-08-06T14:40:37+5:302018-08-06T14:43:08+5:30
संत निरंकारी मंडळ मिशनच्या पाचव्या सदगुरू माता सरविंदर हरदेव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संत निरंकारी मंडळ शोकसागरात बुडाला आहे.
नवी दिल्ली - संत निरंकारी मंडळ मिशनच्या पाचव्या सदगुरू माता सरविंदर हरदेव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संत निरंकारी मंडळ शोकसागरात बुडाला आहे. दिल्लीच्या बुराडी येथील संत निरंकारी कॉलोनीमध्ये माता सरविंदर यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या.
माता सरविंदर यांच्या आजारीपणामुळेच 17 जुलै रोजी त्यांनी संत निरंकारी मंडळाचे सहावे सदगुरू म्हणून त्यांची लहान मुलगी सुदीक्षा यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी, बाबा हरदेव महाराज यांच्या इच्छेनुसार अजून खूप काही करायचे बाकी असल्याचे सरविंदर यांनी त्यावेळी म्हटले होते. सध्या सुदीक्षा यांच्यावर मोठी जबाबदारी असून त्यांच्याकडून त्याची पूर्ती होईल, अशी अपेक्षा संत निरंकारी मिशनला आहे. त्यामुळेच मिशनच्या सदगुरूपदी सुदीक्षा सरविंदर हरदेव महाराज राहणार आहेत. माता सुदीक्षा यांनी मनोविज्ञान मध्ये ऑनर्स पदवी प्राप्त केली आहे. तसेच मिशनच्या कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग असून डिसेंबर 2016 पासून त्यांनी मिशनच्या विदेश विभागाची जबाबदारी सांभाळली आहे.