चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहाची मदत, भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 02:12 PM2017-10-24T14:12:57+5:302017-10-24T14:19:02+5:30
भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय विचार करत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले.
नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय विचार करत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधल्या भारताच्या सीमा चीनला लागून आहेत. या तीन राज्यातील 25 रस्त्यांची कामे जलदगतीने सुरु असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. चीनला लागून असणा-या सीमेवर तैनात असणा-या आटीबीपीच्या जवान आणि अधिका-यांना प्रशिक्षणा दरम्यान मंदारीन भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सीमेवर तैनात असताना त्यांना भाषेच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही अशी माहिती असे राजनाथ सिंह यांनी दिली.
लडाखमध्ये बॉर्डर पोस्टचे एक मॉडेल बनवण्यात आले असून, हे मॉडेल यशस्वी झाले तर, सर्वत्र त्याच मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल असे राजनाथ सिंह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयटीबीपीला जी-सॅट उपग्रहाचा वापर करण्याचे अधिकार दिले आहेत. जी-सॅट भारताचा कम्युनिकेशन आणि टेहळणी उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भारतीय सीमांवर लक्ष ठेवले जाते. आयटीबीपी जी-सॅटकडून मिळणा-या माहितीचे मुख्य केंद्र असेल असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
बीएसएफकडे बांगलादेश आणि पाकिस्तानला लागून असणा-या सीमेची जबाबदारी आहे. एसएसबी भारत-नेपाळ सीमेचे संरक्षण करते तर चीनला लागून असणा-या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आयटीबीपीकडे आहे. वेगवेगळया सीमांवर तैनात असलेल्या फोर्सेसाना उपग्रहांच्या माध्यमातून आता थेट माहिती मिळणार असल्याने विविध दुर्गम भागांवर लक्ष ठेवणे सोपे होईल तसेच शत्रूच्या प्रत्येक हालचाली टिपून वेळीच कारवाई करता येईल.
चीनच्या सीमावर्ती भागात १00 नवे रस्ते बांधणार
चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारकडे तयार आहे. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुस-या व तिस-या टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली.