‘इस्रो’ खासगी कंपन्यांकडून तयार करून घेणार उपग्रह
By admin | Published: September 5, 2016 04:15 AM2016-09-05T04:15:05+5:302016-09-05T04:15:05+5:30
विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेता असे उपग्रह खासगी कंपन्यांकडून तयार करून घ्यायचे
बंगळुरु: विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेता असे उपग्रह खासगी कंपन्यांकडून तयार करून घ्यायचे व त्यांचे अंतराळात प्रक्षेपण स्वत: करायचे, असे नवे धोरण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ठरविले आहे. अशा प्रकारे खासगी कंपनीकडून तयार केलेल्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण येत्या मार्चमध्ये केले जाणे अपेक्षित आहे.
‘इस्रो’च्या उपग्रह केंद्राचे संचालक एम. अण्णादुराई यांनी सांगितले की, प्रक्षेपणासाठी लागणारे उपग्रह स्वत: तयार करण्यात सध्या ‘इस्रो’चा बराच वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो. हवे त्या प्रकारचे उपग्रह खासगी कंपन्यांकडून तयार करून घेतल्याने आम्हाला संशोधन व अधिक सुदूर अंतराळात अवकाश याने सोडण्याच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल.
सुरुवातीस ‘इस्रो’ स्वत:च्या देखरेखीखाली असे उपग्रह तयार करून घेईल व अंतिमत: तंत्रज्ञान हस्तांतरण करून देशातील व जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वच उपग्रह खासगी क्षेत्राकडून तयार करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आत्ताही ‘इस्रो’ स्वत: उपग्रह तयार करताना त्यासाठी लागणारे विविध प्रकारचे सुटे भाग व यंत्रणा बव्हंशी खासगी कंपन्यांकडूनच घेत असते. अशा देशातील १०० पुरवठादार कंपन्यांकडे ‘इस्रो’न जूनमध्ये, तंत्रज्ञान व आरेखने पुरविली तर संपूर्ण उपग्रह तयार करून देण्यात स्वारस्य आहे का, अशी विचारणा केली होती व त्यांच्याकडून निविदांच्या स्वरूपात देकार मागविले होते. त्यापैकी ४० कंपन्यांनी अशी तयारी दर्शविली असल्याचे अण्णादुराई म्हणाले. सध्याच्या गरजा विचारात घेता भारताला सध्या ‘डीटीएच’ टीव्ही प्रक्षेपण. दूरसंचार सेवा आणि नागरी नियोजन व आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘मॅपिंग’ याकरता पुढील पाच ते सात वर्षे दर महिन्याला सरासरी एक उपग्रह अंतराळात सोडावा लागणार आहे. आम्ही इच्छुकांमधून सक्षम भागिदार निवडू, त्यांना कामात तयार करू व त्यांनी केलेल्या कामाचे प्रमाणीकरण करू. उपग्रहांच्या गरजेचा आकडा पाहता बाहेरच्या पुरवठादारांशी अशी भागिदारी सुरु करून ती भक्कम करणे गरजेचे आहे, असेही अण्णादुराई यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
>मोठी जागतिक बाजारपेठ
ताज्या अंदाजानुसार लहान आणि लघु उपग्रह तयार करण्याचा सध्याचा जागतिक उद्योग २.२२ अब्ज डॉलरचा आहे. सन २०२०पर्यंत तो ५.३२ अब्ज डॉलरवर पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
सध्या ‘इस्रो’ स्वत:चे उपग्रह सोडण्याखेरीज
इतर देशांचे व खासगी संस्थांचे उपग्रहही
प्रक्षेपित करते. त्यासाठी लागणारे जे उपग्रह सध्या परदेशांत बनविले जातात त्यांचे कामही भारतीय कंपन्यांना मिळू शकेल.