खाणकामांवर निगराणीसाठी उपग्रहांची मदत
By admin | Published: December 20, 2015 10:59 PM2015-12-20T22:59:16+5:302015-12-20T22:59:16+5:30
अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रहांकडून मिळणाऱ्या चित्रांच्या मदतीने देशातील अवैध खाणकाम हुडकून काढण्यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे.
दिल्ली : अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रहांकडून मिळणाऱ्या चित्रांच्या मदतीने देशातील अवैध खाणकाम हुडकून काढण्यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) सहकार्य घेणार आहे.
राज्यांना आपल्या खाणींचे उपग्रहांमार्फत छायाचित्र घेण्यासाठी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आणि प्रत्येक १५ ते ३० दिवसांत ते नियमितपणे अद्ययावत सांगितले जाईल. यामुळे अधिकाऱ्यांना अवैध खाणकाम सुरू असलेल्या ठिकाणांचा शोध घेणे आणि खनिजांच्या उत्खननाला आळा घालण्यात मदत मिळेल.
याबाबत राज्यांशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि या योजनेची अंमलबजावणी पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
नागरिकांना उत्तम आणि प्रभावी सेवा पुरविण्यासाठी इस्रोशी सहकार्य करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या प्रारंभी खनन आणि शहर विकास मंत्रालयासह अन्य काही मंत्रालयांना दिलेले होते. अवैध खाणकामांवर निगराणी ठेवण्यासाठी सरकारने योजना तयार केल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. प्रमुख खनिज पदार्थांचा शोध घेण्यासाठी इंडियन ब्युरो आॅफ माईन्स (आयबीएम) आणि इस्रो यांच्यादरम्यान स्वाक्षरी होणार असलेल्या सामंजस्य कराराचा (एमओयू) मसुदा आयबीएमद्वारे तयार करण्यात आलेला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.