यंदा मान्सून समाधानकारक, महाराष्ट्रातही चांगला बरसणार पाऊस; ९८ टक्के पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 04:41 AM2021-04-17T04:41:57+5:302021-04-17T06:47:00+5:30
Monsoon : हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार पॅसिफिक महासागर व हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहील.
नवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढविली असतानाच एक दिलासादायक बातमी आहे. यंदा देशात समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यापूर्वी स्कायमेटनेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला हाेता, तर महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार पॅसिफिक महासागर व हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहील. देशात गेल्या दाेन वर्षांपासून मान्सून सरासरीएवढा बरसला आहे. यंदा ‘अल निनाे’चा प्रभाव कमी राहील. ‘आयएमडी’च्या माहितीनुसार सध्या ‘अल निनाे’ची स्थिती न्यूट्रल आहे. त्यामुळे भारतात मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम हाेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारतात सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे.