सतीश कौशिक मृत्यू: पोलिस फार्महाउसवर; विकास मालू म्हणाले, “तिने पुरावे द्यावेत”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 05:41 AM2023-03-14T05:41:59+5:302023-03-14T05:43:15+5:30
अभिनेता सतीश कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिस विकास मालू यांच्या फार्म हाउसवर धडकले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अभिनेता सतीश कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी दिल्लीपोलिस रविवारी रात्री सतीश यांचे मित्र विकास मालू यांच्या फार्म हाउसवर धडकले. तेथील रजिस्टर तपासण्यासह त्यांनी कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली. होळी खेळण्यासाठी सतीश याच फार्महाऊसवर आले होते व येथेच प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. फार्महाऊसचे मालक विकास मालू यांच्या पत्नी शान्वी मालू यांनी सतीश कौशिक यांचा मृत्यू नैसर्गिक नसून, त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता. आपल्या पतीने त्यांची हत्या घडवून आणल्याचे शान्वी यांनी म्हटले होते. पोलिस आता शान्वीचा जबाब घेणार आहेत.
शान्वीने पुरावे द्यावेत : मालू
या प्रकरणी विकास मालूने पत्नीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, ‘माझी चूक असेल, तर मी काहीही सोसायला तयार आहे. शान्वीकडे माझ्याविरुद्ध पुरावे असतील, तर तिने ते दाखवावेत.
विकासच्या पत्नीचे आरोप निराधार
- अभिनेता सतीश कौशिकच्या हत्येचा दावा त्यांची पत्नी शशी यांनी फेटाळला असून, शान्वीला केस मागे घेण्यास सांगितले आहे.
- विकास स्वतः खूप श्रीमंत आहेत. मग, त्यांना सतीशकडून पैसे घेण्याची गरज का पडेल?
- शवविच्छेदन अहवालात सतीश कौशिक यांना ९८ टक्के ब्लॉकेज असल्याची पुष्टी झाली आणि त्यांच्या नमुन्यात कोणतेही औषध आढळले नाही.
- मग, ड्रग्ज देऊन त्यांची हत्या झाल्याचा दावा ती कशी करत आहे, असा सवाल शशी यांनी केला.
ड्रग्जच्या माध्यमातून सतीशची हत्या
शान्वी यांनी शनिवारी दिल्ली पोलिस आयुक्त कार्यालयात पतीविरोधात तक्रार दाखल केली. सतीशने आपल्या पतीला १५ कोटी रुपये दिले होते आणि सतीश ते परत मागत होते. माझ्या पतीला हे पैसे परत द्यायचे नव्हते. त्यामुळे त्याने काही औषधांच्या माध्यमातून सतीश यांची हत्या केली, असा दावा शान्वी यांनी केलेला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"