Satpuda tiger project: सातपुडा व्याघ्र प्रकल्प अबाधित होणार, गावे इतरत्र करणार पुनर्वसित; सरकारने लागू केले होते धोरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:59 AM2022-06-18T07:59:18+5:302022-06-18T07:59:44+5:30
Satpuda tiger project: वन्यजीवांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट वसतिस्थानपैकी एक असलेले सातपुडा व्याघ्र प्रकल्प नजीकच्या भविष्यात गावरहित होणार आहे. याच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असलेल्या बोरी अभयारण्याच्या हद्दीतून गेल्या आठवड्यात स्थानांतरित केलेले सुपलई हे शेवटचे गाव होय.
- अभिलाष खांडेकर
भोपाळ : वन्यजीवांसाठी भारतातील सर्वोत्कृष्ट वसतिस्थानपैकी एक असलेले सातपुडा व्याघ्र प्रकल्प नजीकच्या भविष्यात गावरहित होणार आहे. याच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असलेल्या बोरी अभयारण्याच्या हद्दीतून गेल्या आठवड्यात स्थानांतरित केलेले सुपलई हे शेवटचे गाव होय.
होशंगाबाद जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पातील ५५ गावांमुळे वाघांच्या संरक्षणात अडचणी निर्माण होत आहेत. या व्याघ्र प्रकल्पात ७० वाघ आढळले असून, येथील वाघांची संख्या लवकरच वाढण्याची शक्यता आहे.
व्याघ्र प्रकल्पातील गावे इतरत्र पुनर्वसित करण्यासाठी भारत सरकारने एक धोरण लागू केले होते. अलीकडच्या भरपाई योजनेनुसार एका युनिटला (कुटुंबातील एक प्रौढ व्यक्ती) व्याघ्र प्रकल्पातून स्थानांतरित केल्यास १५ लाख रुपये मिळतात.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण विस्थापित कुटुंबांना देशभरातील वन विभागामार्फत भरपाई देते.
सातपुडा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक एल. के. कृष्णमूर्ती यांनी ‘लोकमत’ला फोनवरून सांगितले की, देशातील काही अभयारण्यांपैकी गावरहित होणारे बोरी वन्यजीव अभयारण्य एक आहे. व्याघ्र संर्वधानाच्यादृष्टीने हे मोठे यश आहे. यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यातील संघर्ष कमी होईल.
माजी क्षेत्रीय संचालक आर. पी. सिंह यांनी काही वर्षांपूर्वी इतरत्र स्थानांतरित करण्याची योजना सुरू केली होती. सुपलई गाव इतरत्र पुनर्वसित करण्याचे स्वागत केले आहे. उद्यान व्यवस्थापनातील एक मोठे यश आहे. त्यामुळे भारतातील वाघांचे संरक्षण करण्यासाठी मदत होईल. सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित क्षेत्रातून ८ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहेत.