कर्मचारी ते सुपर बॉसची खुर्ची; ट़ॉप CEO ची सक्सेस स्टोरी; तरुणांना दिला लाखमोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 11:08 AM2023-03-29T11:08:28+5:302023-03-29T11:35:26+5:30
Satya Nadella : सत्या नडेला यांनी तरुणांना करिअरबाबत एक लाखमोलाचा सल्ला दिला आहे.
मायक्रोसॉफ्ट या दिग्गज आयटी कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांनी तरुणांना करिअरबाबत एक लाखमोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, नोकरी किंवा व्यवसायात नेहमी तुमच्याकडे असलेले काम सर्वात महत्त्वाचे आहे असे गृहीत धरा. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झालेले सत्या नडेला आज कंपनीचे सीईओ आहेत. करिअर आणि आयुष्याबाबतचा त्यांचा विचार स्पष्ट होता, त्यामुळेच प्रत्येक पावलावर यश मिळाल्याचं त्यांनी सांगितले.
लिंक्डइनचे सीईओ रायन रोसलँस्की यांना दिलेल्या मुलाखतीत नडेला म्हणाले की, मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत असताना सीईओ बनण्याचा विचार त्यांच्या मनातही आला नव्हता. त्यांना जी काही भूमिका मिळाली त्यात त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.
"सर्व कामं मनापासून करा"
जेव्हा नडेला यांना मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांच्या 30 वर्षांच्या काळात शिकलेल्या सर्वात महत्त्वाच्या शिकवणीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, "ऑफिसमध्ये सर्वोत्तम काम करत राहा आणि तुम्ही कुठेही असलात तरी चांगले काम करण्यासाठी पुढील नोकरीची वाट पाहू नका. तिथे पूर्ण समर्पणाने नोकरी करा."
नडेला म्हणाले की मायक्रोसॉफ्टमधील त्यांच्या 30 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही त्यांचे काम हलके घेतले नाही आणि मी करत असलेले काम महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली. हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे, उत्साहाने, वचनबद्धतेने आणि जबाबदारी घेण्याच्या तयारीने, नडेला पुढे गेले आणि एक दिवस आला जेव्हा ते कंपनीचे सीईओ बनले.
"करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःचे काम चांगले करणे आवश्यक"
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले की, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःचे काम चांगले करणे आवश्यक आहे. तुमची सध्याची नोकरी तुमच्या करिअरमध्ये अडथळा आणत आहे किंवा तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखत आहे असा विचार करू नका. प्रत्येक नोकरी आणि क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तुमच्यात समर्पण आणि उत्सुकता असली पाहिजे. या विचाराने, तुम्ही दीर्घकाळात तुमच्या करिअरमध्ये चांगल्या ठिकाणी असाल. सत्या नडेला म्हणाले की, सीईओ झाल्यानंतरही अनेक नवीन गोष्टी शिकत राहिलो आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"