गंगा नदी स्वच्छतेसाठी देशात १०८ ठिकाणी सत्याग्रह; पुण्यातही सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 04:30 PM2020-08-11T16:30:06+5:302020-08-11T16:33:35+5:30
एक दिवस गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी सत्याग्रह अशी ही मोहिम असणार आहे.
पुणे : गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी पुण्यासह देशात १०८ ठिकाणी सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्याची सुरवात हरिद्वार येथील स्वामी शिवानंद सरस्वती यांच्यापासून झाली आहे. पुण्यात देखील अनेक कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला असून, सत्याग्रह साखळी सुरू करण्यात आली आहे. एक दिवस गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी सत्याग्रह अशी ही मोहिम असणार आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंग यांनी मोहिम सर्वत्र नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गंगा स्वच्छ करण्यासाठी यापूर्वी पर्यावरणतज्ज्ञ जी. डी. अग्रवाल उर्फ स्वामी सानंद यांनी सत्याग्रह करून ११२ दिवस उपोषण केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू फक्त गंगामाता स्वच्छ व्हावा, यासाठी होता. आता पुन्हा एकदा बलिदान देण्यासाठी स्वामी शिवानंद सरस्वती हरिद्वार येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी ३ आॅगस्टपासून हे उपोषण सुरू केले आहे.
अभियानाविषयी पुण्यातून विनोद बोधनकर संयोजन करत असून, त्यांच्यासोबत जीवितनदी संस्था, सारंग यादवडकर, अनुपम सराफ, शैलजा देशपांडे व इतर संस्थाही सहभागी झाल्या आहेत. या विषयी धर्मराज पाटील म्हणाले,‘‘गेल्या अनेक वर्षांपासून देशातील नद्या अस्वच्छ आणि प्रदूषित झालेल्या आहेत. त्या स्वच्छ करण्यासाठी स्वामी सानंद यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून त्यांची ही मोहिम आता देशभर आणि जागतिक स्तरावर नेणे आवश्यक आहे. संयुक्त राष्टÑ संघात देखील या मोहिमेची माहिती दिली आहे. दररोज एक जण उपोषण करून या सत्याग्रहात सहभागी होत आहेत.’’
=====================
स्वामी सानंद यांचे बलिदान विसरू शकत नाही. त्यांची स्वच्छ गंगेची मोहिम आपण पुढे नेणे आवश्यक आहे. सरकार यावर काहीच करताना दिसत नाही. स्थानिक, राज्य, देश आणि जागतिक पातळीवर याबाबत जनजागृती झाली तर गंगा स्वच्छतेसाठी प्रयत्न होतील.
- डॉ. राजेंद्रसिंग, जलतज्ज्ञ