सत्यम घोटाळा: रामलिंग राजूना ७ वर्षांची शिक्षा
By admin | Published: April 9, 2015 11:59 AM2015-04-09T11:59:43+5:302015-04-09T14:38:33+5:30
देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या 'सत्यम कॉम्प्युटर्स' घोटाळाप्रकरणातील दोषी रामलिंग राजू यांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ९ - देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या 'सत्यम कॉम्प्युटर्स' घोटाळाप्रकरणातील दोषी रामलिंग राजू यांना ७ वर्षांचा कारावास आणि पाच कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरूवारी हैदराबादमधील विशेष न्यायालयाने बी. रामलिंग राजूंसह दहा जणांना दोषी ठरवले. विशेष न्यायाधीश बीव्हीएल एन. चक्रवर्ती यांनी हा निकाल दिला असून रामलिंग राजू यांना फसवणूक, विश्वासघात, खोटी कागदपत्रे बनविणे आणि ‘क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट‘ या गुन्ह्यांखाली दोषी ठरवले असून त्यांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. सुमारे सहा वर्षे चाललेल्या या खटल्यात तीन हजार कागदपत्र व २२६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. याप्रकरणी राजू यांनी आधीच ३२ महिने (सुमारे अडीच वर्ष) तुरूंगात काढले आहेत.
आर्थिक गैरव्यवहारांसाठीच्या विशेष न्यायालयाने ‘सत्यम'चे माजी अध्यक्ष बी. रामलिंगम राजूंसह त्याचा भाऊ बी. रामा राजू (व्यवस्थापकीय संचालक, सत्यम), वदलमणी श्रीनिवास (माजी मुख्य वित्तीय अधिकारी), जी. रामकृष्ण (माजी उपाध्यक्ष) व अंतर्गत हिशेब तपासणी विभागप्रमुख व्ही.एस. प्रभाकर गुप्ता आदींवर १४ वर्षे भांडवली बाजारात कोणत्याही पद्धतीने सहभागी होण्यास बंदी घातली आहे.
काय आहे 'सत्यम घोटाळा'
७ जानेवारी २००९ रोजी त्या वेळी देशातील चौथ्या क्रमांकाची आयटी कंपनी म्हणून नावाजलेल्या सत्यमचा संस्थापक असलेले रामलिंग राजू यांनी सेबीला ई-मेल पाठवून आपण कंपनीच्या जमा खात्यातील रकमेचा आकडा तसेच बँकांमधील ठेवींची रक्कम फुगवून सांगितल्याची कबुली दिली. या फसवणूकीमुळे कंपनीचे १४ हजार १६२ कोटींचे नुकसान झाले होते. त्यानंतर सीबीआयने राजू यांच्यासह कंपनीतील अन्य १० जणांवर गुन्हा दाखल केला होता.