तामिळनाडूतील सत्यमंगलम अभयारण्य
By Admin | Published: January 19, 2017 05:06 AM2017-01-19T05:06:36+5:302017-01-19T05:06:36+5:30
भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे.
भारताच्या पश्चिम घाटात वसलेले तामिळनाडूतील सत्यमंगलम वन्यजीवन अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे. सत्यमंगलमला २००८ मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात येऊन २०११ मध्ये त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. १,४११.६ चौरस कि.मी.चे क्षेत्र असलेले सत्यमंगलम तामिळनाडूतील सर्वांत मोठे अभयारण्य आहे. २०१३ मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. सत्यमंगलम उष्णकटीबंधीय शुष्क जंगल असून, ते पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते. २००९ मध्ये करण्यात आलेल्या प्राणिगणनेनुसार येथे १० वाघ, ८६६ भारतीय हत्ती, ६७२ गवे आणि २७ बिबटे होते. तथापि, २०१२ च्या गणनेत पंचवीसहून अधिक वाघ येथे दिसून आले. जगात सर्वाधिक आशियाई हत्ती येथेच आहेत. सत्यमंगलममध्ये हरणांच्या विविध प्रजाती असून, जंगली म्हशींचे कळपही आढळून येतात. या अभयारण्यात इलुगा आणि सोलिगा या दोन आदिवासी जमातींच्या वसाहती असून, मध आणि इतर वनसंपदेद्वारे त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनचे तस्करी साम्राज्यही याच जंगलात होते. तो हत्तींना मारून त्यांच्या दाताची तसेच चंदनाच्या झाडांची तस्करी करीत असे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते राजकुमार यांचे अपहरण करणाऱ्या वीरप्पनने अनेकांची हत्या केली होती. २००४ मध्ये तामिळनाडू पोलिसांनी या क्रूरकर्म्याला ठार केले होते.