मक्केतील ‘उमरा’ यात्रेसाठी जगभरातील नागरिकांवर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 04:41 AM2020-02-28T04:41:43+5:302020-02-28T04:42:28+5:30
अनिश्चित काळापर्यंत व्हिसा रद्द; कोरोना विषाणूमुळे सौदी सरकारचा निर्णय
- जमीर काझी
मुंबई : चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका आता भारतातून मक्का, मदिना येथे धार्मिक यात्रेसाठी (उमरा) जाणाऱ्या मुस्लिमांना बसला आहे. सौदी अरेबिया सरकारने गुरुवारी भारतासह आशिया खंडातील देशांतील नागरिकांना अनिश्चित काळासाठी प्रवेश बंदी घातली आहे. त्यासाठी सौदी दुतावासाकडून जारी केलेले ‘उमरा आणि पर्यटनासाठी व्हिसा अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहेत.
मक्का आणि मदिना शहरातील हज यात्रेचा मुख्य विधी यावर्षी आॅगस्टच्या मध्यावर आहे. तोपर्यंत कोरोनाचा (कोविड - १९) प्रादुर्भावावर प्रतिबंध न बसल्यास भारतीयांच्या हज यात्रेवरही निर्बंध लागण्याची शक्यता आहे. ‘उमरा’चा विधी वर्षातील साधारण दहा महिने सुरु असतो. त्यासाठी भारतातून दररोज जवळपास २०० भाविक सौदी अरेबियाला प्रस्थान करतात. याशिवाय हज यात्रेसाठी हज कमिटी व खासगी टूर्स कंपनीकडून सुमारे पावणे दोन लाखांहून अधिक भाविक जातात. कोरोनावर नियंत्रण न आल्यास ‘उमरा’बरोबरच हज यात्रेकरूंनाही त्याचा फटका बसेल.
चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, लाखांहून अधिक जणांना त्याची लागण झाली. त्यामुळे सौदी सरकारने जगभरातून त्यांच्याकडे येणाºया भाविकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ‘उमरा’ व पर्यटनासाठीचे व्हिसा रद्द केले. कोरोना आटोक्यात आल्यानंतर प्रवासासाठी परवानगी दिली जाईल, असे सौदी सरकारने स्पष्ट केले. भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, चीन, जपान, थायलंड, कोरिया, इटली, इराण,येमेन, फिलीपिन्स आदी देशांच्या नागरिकांवरही बंदी घालण्यात आली.
भारतातून रोज २०० यात्रेकरूंचा प्रवास
‘उमरा‘चा विधीमध्ये रमे जमरात, कुर्बानी हे हज यात्रेतील विधी नसतात. तसेच मीना, अरफात, मुजदलबा येथे वास्तव्य नसते. तवाफ हे विधीही नसतात. ज्यांना हजला जाणे शक्य होत नाही, ते उमरासाठी सोयीनुसार जातात. भारतातून सरासरी २०० जण यात सहभागी होतात. एका यात्रेकरुकडून टूर चालक त्यांच्या सुविधाप्रमाणे सरासरी ६० हजार ते १ लाखांपर्यंत शुल्क घेतात.
- हाजी बालेचॉँद भालदार, उपाध्यक्ष, हज फाऊंडेशन
हज यात्रेच्या वेळापत्रकात बदल नाही
सौदी सरकारने उमरा व पर्यटनासाठीचे व्हिसा रद्द केला असला तरी आॅगस्टमधील हज यात्रेबाबत काही निर्णय घेतला नाही. भारतातून त्याचे नियोजन पूर्वीप्रमाणेच कायम असून त्यामध्ये बदल केलेला नाही.
- डॉ. मकसुद खान, मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी आॅफ इंडिया