सौरभ भारद्वाज बनले आता 'बेरोजगार नेता', पराभवानंतर उघडले YouTube चॅनल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 11:26 IST2025-02-13T11:02:52+5:302025-02-13T11:26:23+5:30
Saurabh Bharadwaj : ग्रेटर कैलाश मतदारसंघातून पराभूत झालेल्या सौरभ भारद्वाज यांनी स्वतःचे युट्यूब चॅनेल उघडले आहे.

सौरभ भारद्वाज बनले आता 'बेरोजगार नेता', पराभवानंतर उघडले YouTube चॅनल
Saurabh Bharadwaj : नवी दिल्ली : नुकत्याच दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यात सौरभ भारद्वाज यांच्याही समावेश आहे. या पराभवानंतर आता सौरभ भारद्वाज हे युट्यूब (YouTube) चॅनलकडे वळले आहेत.
ग्रेटर कैलाश मतदारसंघातून पराभूत झालेल्या सौरभ भारद्वाज यांनी स्वतःचे युट्यूब चॅनेल उघडले आहे. सौरभ भारद्वाज यांनी आप्लया यूट्यूब चॅनलचे नाव 'बेरोजगार नेता' असे ठेवले आहे. तसेच, "आज असे म्हणता येईल की, आमच्यासारखे नेते बेरोजगार झाले आहेत", असे सौरभ भारद्वाज यांनी यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या पहिल्या ५८ सेकंदांच्या व्हिडिओत म्हटले आहे.
सौरभ भारद्वाज म्हणाले की, "दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने माझे आयुष्य १८० अंशांनी बदलले आहे, आता यूट्यूब चॅनेलद्वारे दररोज लोकांशी संवाद साधणार आहे. अनेक लोक व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर माझ्याशी संपर्क साधत आहेत. राजकारण्याच्या आयुष्यात काय घडते, ते मला तुम्हाला सांगायचे होते. मी सर्वांना उत्तर देईन."
पुढे व्हिडिओमध्ये सौरभ भारद्वाज म्हणाले,"मी माझ्या विचारांद्वारे लोकांशी संपर्क साधेन आणि त्यांना प्रश्न विचारेन, त्यांना माझ्या योजनांबद्दल सांगेन आणि निवडणूक हरल्यानंतर राजकारण्याच्या आयुष्यात कोणते बदल होतात, हे देखील सांगेन. या चॅनेलद्वारे मी माझा प्रवास शेअर करू इच्छितो आणि या प्रश्नांची थेट उत्तरे देऊ इच्छितो."
"उदरनिर्वाहासाठी पैशांची गरज"
उदरनिर्वाहासाठी पैसे कमवण्याची गरज असल्याचे सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. प्रत्येकाला वाटते की एकदा आमदार किंवा खासदार झाला की त्याला पैशांची गरज नाही, पण माझ्या बाबतीत तसे नाही. आपल्याला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. माझी टीम देखील चॅनेलद्वारे काही मदत करण्यास तयार आहे, असे सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.
"पराभवाचा अनुभव शेअर करणार"
निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल सुद्धा सौरभ भारद्वाज बोलणार आहेत. ते म्हणाले, "ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ पोस्ट करेन. जिंकल्यावर प्रत्येकजण आपल्या अनुभवांबद्दल बोलतो. मी माझ्या पराभवाचा अनुभव सांगेन आणि आपण त्यावर चर्चा करू. तसेच, बरेच लोक मला व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर लिहित आहेत, मी त्यांची मते देखील विचारात घेईन", असेही सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.