"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:09 PM2024-10-22T17:09:51+5:302024-10-22T17:26:45+5:30
Saurabh Bharadwaj And BJP : आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राजधानीत सणासुदीच्या काळात सुरू असलेली गुन्हेगारी, हिंसा, गँगवॉर रोखण्यात भाजपा अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले, "आजकाल संपूर्ण देशभरात सणांचं वातावरण आहे आणि येत्या महिनाभरात देशात अनेक सण साजरे केले जातील."
"बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पण आज बाजारात जाताना लोकांच्या मनात एक भीती असते की, केव्हापण गँगवॉर सुरू होईल आणि गोळ्या झाडल्या जातील, स्फोट होतील, गुंड कधी कुणाच्या घरात घुसून मारतील... त्यामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सर्व यंत्रणा चालवण्याची जबाबदारी, दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारची आहे."
BJP की वजह से ख़ौफ़ के साए में जीने को मज़बूर हैं दिल्ली वाले‼️#BJPMakesDelhiCrimeCapitalpic.twitter.com/NELMvDbyWi
— AAP (@AamAadmiParty) October 22, 2024
"केंद्रात बसलेलं भाजपा सरकार दिल्ली या छोट्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाही. ते देशाच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था कशी सांभाळणार आहेत? दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि या राजधानीत पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, राष्ट्रपतींचं निवासस्थान आहे, सर्व मंत्रालयं येथे आहेत, संसद भवन येथे आहे, सर्वोच्च न्यायालय येथे आहे. दिल्ली, सीबीआय, एसीबी, एनएसजी, दिल्ली पोलिसांचे मुख्यालय, सर्व मोठ्या सुरक्षा संस्था आणि सरकारचे विभाग दिल्लीत आहेत आणि हे सर्व असूनही, गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या आज दिल्लीत सक्रिय आहेत."
"आज दिल्लीची स्थिती अशी आहे की, मिठाईच्या दुकानांमध्ये गोळ्या झाडल्या जात आहेत, कारच्या शोरूममध्ये गोळ्या झाडल्या जात आहेत, ग्रेटर कैलासमधील जिमच्या बाहेर वेलकम कॉलनीत रस्त्यावर खुलेआम ६० राउंड गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मालकाची हत्या, रोहिणीतील एका दाम्पत्याच्या घरात घुसून ५ कोटी रुपये लुटले. रोज उघडपणे गुन्हे घडत असतात" असंही देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.