गाईला वाचवण्यासाठी मुस्लिम युवकाची विहीरीत उडी
By Admin | Published: October 5, 2015 11:39 AM2015-10-05T11:39:36+5:302015-10-05T13:23:37+5:30
लखनौमध्ये एका मुस्लिम युवकाने विहीरीत उडी मारून गाईचे प्राण वाचवले.
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ५ - घरात गोमांस साठवून खाल्ल्याच्या संशयामुळे दादरी येथे एका मुस्लिम नागरिकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे एका मुस्लिम युवकाने विहीरीत उडी मारून गाईचे प्राण वाचविल्याची घटना घडली आहे.
लखनौजवळील पॉलीखेडा येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद झाकी हा २० वर्षीय तरूण मशिदीतून घरी परत येत असताना एका विहीरीजवळ लोकांची खूप गर्दी जमल्याचे त्याने पाहिले. त्या विहीरीत एक गाय पडल्याचे त्याच्या लक्षात आले, बरेच लोक तिथे उपस्थित असतानाही कोणीही विहीरीत उतरून त्या गाईला वाचवण्याचा प्रयत्न करत नव्हते, उलट सर्वजण क्रेनची वाट पाहत उभे होते. मोहम्मद तेथे पोचल्यानंतर लगेच क्रेन आली, त्यानंतर मोहम्मदने स्वतL विहीरीत उतरून गाईला पट्टे बांधून क्रेनला अडकवले व तिला सुखरूप बाहेर काढले. ३५ फूट खोल विहीरात उडी मारून त्याने गाईचे प्राण वाचवले.
' त्या गाईचा जीव धोक्यात होता, म्हणून मी विहीरीत उतरलो. एवढ्या खोल विहीरात पडल्याने ती घाबरली होती आणि तिने मला लाथही मारली, ज्यामुळे माझा पाय सुजला आहे. पण मी तिला पट्ट्याने बांधून क्रेनला अडकवले, त्यानंतर तिला बाहेर काढण्यात आले' असे मोहम्मदने सांगितले.