कबूतराला वाचवताना मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू
By admin | Published: March 31, 2016 10:20 AM2016-03-31T10:20:06+5:302016-03-31T10:20:06+5:30
गटाराचे पाणी वाहून नेणा-या पाईपमध्ये अडकलेल्या कबूतराला वाचवताना दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दिल्लीत वझीराबादमध्ये घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - गटाराचे पाणी वाहून नेणा-या पाईपमध्ये अडकलेल्या कबूतराला वाचवताना दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दिल्लीत वझीराबादमध्ये घडली. १९ वर्षीय अनिल सहानी सोमवारी संध्याकाळी कबुतरांना दाणे घालण्यासाठी पाईपलाईन जवळ गेला होता. त्यावेळी त्याचे लक्ष उघडया मॅनहोलवर गेले.
तिथे चिखलामध्ये एक कबूतर अडकले होते. त्या कबुतराला मॅनहोलमधून बाहेर काढण्यासाठी म्हणून अनिल खाली वाकला पण त्याचा तोल गेला आणि तो गटारात पडला असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अनिलला बाहेर काढण्यासाठी नासीरुद्दीनला तिथे बोलवण्यात आले. पोहण्यात पारंगत असलेल्या नासीरने बुडणा-यान अनेकांचे प्राण वाचवले असल्याने स्थानिकांनी नासीरुद्दीनला बोलवून घेतले.
नासीर लगेच मॅनहोलमध्ये उतरला. पण पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना गटारात धड उभेही रहाता येत नव्हते आणि चिखलामुळे पोहताही येत नव्हते. दोघेही तिथे अडकून पडले. गटारातील विषारी वायूमुळे लगेचच त्यांना श्वासोश्वासाचा त्रास सुरु झाला. त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आले. पण तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.