अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:30 PM2024-09-30T18:30:16+5:302024-09-30T18:31:19+5:30
Savitri Jindal : नवीन जिंदाल हे सावित्री जिंदाल यांच्या प्रचारापासून दूर आहेत. मात्र, त्यांची पत्नी शालू जिंदाल या सावित्री जिंदाल यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
Haryana Assembly Elections 2024 : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल हरियाणा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्या भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत.
दरम्यान, नवीन जिंदाल हे सावित्री जिंदाल यांच्या प्रचारापासून दूर आहेत. मात्र, त्यांची पत्नी शालू जिंदाल या सावित्री जिंदाल यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. शालू जिंदाल या आपल्या सासूसाठी मतं मागत आहेत. तसेच, नवीन जिंदाल यांची मुलेही प्रचारात उतरली आहेत.
भाजपचे खासदार नवीन जिंदाल हिसार सोडून कुरुक्षेत्रमध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करत आहेत. नवीन जिंदाल हे कुरुक्षेत्रचे खासदार आहेत आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पार्टीचे (आप) सुशील गुप्ता यांचा २९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. आत्तापर्यंत काँग्रेससोबत असलेले नवीन जिंदाल लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची आई सावित्री जिंदाल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.
का अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या?
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सावित्री जिंदाल या हिसारमधून मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले नाही. नुकतेच त्यांनी सांगितले होते की, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी मान्य करणार नाही. तसेच, कोणत्याही पक्षाने निवडणुकीसाठी तिकीट दिले नाही, त्यामुळे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, सावित्री जिंदाल यांनी सांगितले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजप खासदार नवीन जिंदाल यांना आपल्या आईच्या प्रचारापासून लांब राहावे लागले आहे.
मुलासोबत राजकारणावर चर्चा होते का?
सावित्री जिंदाल सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. सावित्री जिंदाल यांनी अलीकडेच सांगितले होते की, मुलगा नवीन जिंदाल यांच्याशी त्या दररोज बोलतात, परंतु राजकारणाच्या विषयावर दोघांमध्ये फारच कमी चर्चा होते.
देशातील सर्वात श्रीमंत महिला; २.७७ लाख कोटींची संपत्ती
हिसारमधून निवडणूक लढवणाऱ्या सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. सावित्री जिंदाल या जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आणि स्टील किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत ओपी जिंदाल यांच्या पत्नी आहेत. फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार, सावित्री जिंदाल या २.७७ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकीन आहेत.
८ ऑक्टोबरला मतमोजणी
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. हरियाणासोबतच जम्मू-काश्मीर विधानसभेसाठीही मतदान सुरू असून आतापर्यंत ३ पैकी २ टप्प्यात मतदान झाले आहे.