देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपला रामराम; उमेदवारी न दिल्याने भरला अपक्ष अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 07:03 PM2024-09-12T19:03:12+5:302024-09-12T19:04:16+5:30

Savitri Jindal : हरिणाया विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने सावित्री जिंदाल यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

Savitri Jindal has filed an independent application after not getting ticket from the BJP Haryana assembly elections | देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपला रामराम; उमेदवारी न दिल्याने भरला अपक्ष अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपला रामराम; उमेदवारी न दिल्याने भरला अपक्ष अर्ज

Haryana Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा होताच पक्षाला अनेकांनी रामराम ठोकला. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होताच हरियाणा भाजपमध्ये मोठा भूकंप झाला. उमेदवारांची यादी जाहीर होताच पक्षात विरोध सुरू झाला. या यादीमुळे  भाजपला नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. अनेक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. या यादीमध्ये आता देशातील सर्वात श्रीमंत महिलेचाही समावेश झाला आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी सत्ताधारी भाजप विरोधात बंड करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ७४ वर्षीय सावित्री जिंदाल यांनी हरियाणाच्या हिस्सार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपले विद्यमान आमदार आणि मंत्री कमल गुप्ता यांना हिस्सारमधून उमेदवार म्हणून उभं केले आहे. 

देशातील सर्वात श्रीमंत महिला आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल यांनी गुरुवारी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. सावित्री जिंदाल या देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि त्यांचा मुलगा नवीन जिंदाल सध्या कुरुक्षेत्रमधून भाजप खासदार आहे. हिस्सारमधून भाजपचे तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या सावित्री जिंदाल यांना काँग्रेसकडून तिकीटाची अपेक्षा होती. काँग्रेसनेही त्यांना तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवलं आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी २४ मार्च रोजी नवीन जिंदाल यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने लगेचच त्यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी दिली. जिथून ते यापूर्वी दोनदा खासदार झाले होते. काही दिवसांनंतर सावित्री जिंदाल यांनी हिसारमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सावित्री जिंदाल या हिसारमधून भाजपच्या उमेदवार असल्याचे मानले जात होते. मात्र पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. 

भाजपकडून तिकीट न मिळाल्यानंतर सावित्री जिंदाल यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.  मी कधीही अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला नाही, असे नुकतेच सावित्री जिंदाल यांनी स्पष्ट केले. मात्र २८ मार्च २०२४ रोजी स्वत: सावित्री जिंदाल यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये भाजपमध्ये सामील होण्याबद्दल भाष्य केलं होतं.

सावित्री जिंदाल हिसारमधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २००५ मध्ये त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. यानंतर २००९ मध्ये त्या निवडून आल्या. २०१३ मध्ये त्या हरियाणाच्या हुडा सरकारमध्ये मंत्री झाल्या. सावित्री जिंदाल यांचे दिवंगत पती ओपी जिंदाल हिसार मतदारसंघातून आमदार होते. ते हरियाणा सरकारमध्ये मंत्रीही होते. २०१४ च्या निवडणुकीत कमल गुप्ता यांनी सावित्री जिंदाल यांचा पराभव केला होता. यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसने राम निवास रारा यांना तिकीट दिले. यावेळीही कमल गुप्ता विजयी झाल्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा कमल गुप्ता विरुद्ध सावित्री जिंदाल असा सामना पाहायला मिळणार आहे.
 

Web Title: Savitri Jindal has filed an independent application after not getting ticket from the BJP Haryana assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.