सावित्रीबाई फुले विद्यापीठास मिळाली अव्वल स्वायत्तता;आणखी १२ दर्जेदार संस्थांनाही मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:26 AM2018-03-21T01:26:25+5:302018-03-21T01:26:25+5:30
‘नॅक’कडून ज्यांना उच्च दर्जा देण्यात आला आहे अशा देशभरातील ६० उच्च शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाने मंगळवारी स्वायत्तता बहाल केली. यात महाराष्ट्रील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह आठ अभिमत विद्यापीठे व ४ महाविद्यालयांचा समावेश आहे.
नवी दिल्ली: ‘नॅक’कडून ज्यांना उच्च दर्जा देण्यात आला आहे अशा देशभरातील ६० उच्च शिक्षण संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाने मंगळवारी स्वायत्तता बहाल केली. यात महाराष्ट्रील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह आठ अभिमत विद्यापीठे व ४ महाविद्यालयांचा समावेश आहे.
‘नॅक’ने दिलेल्या मानांकनानुसार उच्च शिक्षण संस्थांना ‘वर्ग १’ आणि ‘वर्ग २’ अशा दोन वर्गांत श्रेणीनिहाय स्वायत्तता देण्याची नियमावली विद्यापीठ आनुदान आयोगाने १२ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. त्या निकषांनुसार आयागाने या ६० उच्च शिक्षण संस्थांची निवड केली आहे, असे सांगून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संस्थांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली. राज्यांच्या कायद्याने स्थापन झालेल्या देशभरातील एकूण २१ विद्यापीठांना अशी स्वायतत्ता मिळाली असून त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. ‘नॅक’च्या मानांकनात या विद्यापीठाचा चौथा क्रमांक असून त्यानुसार त्याला ‘वर्ग १’ ची स्वायत्तता देण्यात आली आहे.
स्वायत्तता मिळालेल्या देशभरातील एकूण २४ अभिमत विद्यापीठांमध्ये सर्वाधिक आठ अभिमत विद्यापीठे महाराष्ट्रातील आहेत. ही अभिमत विद्यापीठे अशी: होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई; नरसी मोनजी इन्स्टिट्यूट, मुंबई; डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे; सिम्बॉयसिस इंटरनॅशनल, पुणे; इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई; दत्ता मेघे इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, वर्धा; टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस, मुंबई; (सर्व वर्ग १) आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई (वर्ग २). याखेरीज राज्यातील ज्या चार महाविद्यालायांना स्वायत्तता मिळाली आहे त्यांत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, कोल्हापूर; विवेकानंद कॉलेज, कोलहापूर; जयहिंद कॉलेज, मुंबई आणि श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे मिठीबाई आर्ट््स कॉलेज, मुंबई यांचा समावेश आहे.
स्वायत्तता नेमकी कशाची
मंत्री जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वायत्तता मिळाल्यावरही या सर्व संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यकक्षेतच राहतील मात्र नवे अभ्यासक्रम, कॅप्पसबाह्य केंद्रे, कौशल्य विकास अभ्यासक्रम, रिसर्च पार्क इत्यादी सुरु करण्याची त्यांना स्वायत्तता असेल. तसेच या संस्था परदेशी अध्यापक नेमू शकतील, परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतील, अध्यापकांना प्रोत्साहनपर वाढीव वेतन देऊ शकतील, अन्य संस्थांशी शैक्षणिक सहकार्य करू शकतील व दूरस्थ शिक्षण कार्यक्रम राबवू शकतील. स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांनाही अशाच प्रकारचे स्वातंत्र्य मिळणार असले तरी तेथील विद्यार्थ्यांना पदव्या मात्र संबंधित विद्यापीठांकडून दिल्या जातील.