म्हणे, जनता सध्या खुशीमध्ये!
By admin | Published: November 17, 2016 02:47 AM2016-11-17T02:47:04+5:302016-11-17T02:47:04+5:30
पंतप्रधान मोदींनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे देशभर जनता खूश आहे. देशात इमानदारीचा उत्सव
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींनी पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे देशभर जनता खूश आहे. देशात इमानदारीचा उत्सव साजरा होत असून, प्रामाणिकतेचे पर्व सुरू झाले आहे. आजवरच्या इतिहासात प्रथमच इमानदार लोकांचा सन्मान झाला असून, बेईमान लोक दु:खी आहेत. खरे तर राजकीय पक्ष पंतप्रधानांच्या या धाडसी निर्णयाचे हार्दिक स्वागत करतील, असे वाटत होते. प्रत्यक्षात सारे जण विरोध करीत आहेत, ते कशासाठी हे कळत नाही. लोक खूश असल्याचे पाहून हे लोक घाबरलेले तर नाहीत? असा उपरोधिक सवाल केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावावरील चर्चेत बोलताना केला.
इमानदार माणसाला खऱ्या कमाईच्या नोटा जमा करण्यासाठी अथवा बदलण्यास सरकारने तब्बल पन्नास दिवसांचा अवधी दिला आहे. थोडे कष्ट या काळात जरूर सहन करावे लागतील. मात्र, अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या या निर्णयाचे लाभ कालांतराने सर्वांना दिसू लागतील. घोटाळ्यांचे सरकार सत्तेतून घालवून ज्या अपेक्षेने मोदींच्या हाती लोकांनी सत्ता सोपवली, मोदींनी ती अपेक्षा या धाडसी निर्णयाद्वारे पूर्ण केली आहे. या निर्णयाची गोपनीयता ठेवणे आवश्यकच होते. त्याचा फटका फक्त बेईमान लोकांनाच बसला आहे. या निर्णयामुळे महागाई कमी होईल, बँकांचे व्याजदर खाली येतील, करप्रणाली सुधारून कराची टक्केवारी कमी करता येईल, हे लाभ लवकरच जनतेला पाहायला मिळतील, असा दावा त्यांनी केला.
परदेशी बँकांमध्ये ज्यांनी काळा पैसा दडवला आहे, त्यांची नावे जाहीर करणे सरकारला शक्य नाही, असे स्पष्ट करीत गोयल म्हणाले, तसे केल्यास या पुढे जगातून अशी गोपनीय माहिती मिळणेच अवघड होईल. सुप्रीम कोर्टात या नावांसह सारी माहिती सरकार सादर करणारच आहे. त्यानंतर, ही नावे आपोआपच उघड होतील. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या प्रचार मोहिमेवर नेमका किती खर्च झाला, त्याची तपशीलवार माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. वेबसाइटवरही ती उपलब्ध आहे.
विरोधकांशी पंतप्रधान मोदींचे हितगुज-
बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी लोकसभेत पंतप्रधान वेळेपूर्वीच हजर झाले होते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, रामविलास पासवान, अशोक गजपती राजू यांच्यासह सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना नमस्कार करीत पंतप्रधान विरोधी बाकांवरील सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खडगे, थंबी दुरई आदी नेत्यांपर्यंत गेले आणि त्यांना नमस्कार केला.
पंतप्रधानांसमवेत या वेळी गृहमंत्री राजनाथसिंग, संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमारही होते. राजनाथसिंगांनी काही काळ सोनियांशी संवाद साधला. बहुदा त्यांच्या प्रकृतीची ते विचारपूस करीत असावेत, असे गॅलरीतून पाहाताना जाणवले.
नोटबंदीच्या विरोधात तृणमूल काँग्रेसने संसदेतल्या गांधी पुतळ्यापाशी धरणे धरले होते. त्या पक्षाचे कल्याण बॅनर्जी, सुदीप बंदोपाध्याय यांनाही पंतप्रधान लोकसभेच्या सभागृहात काही क्षणांसाठी भेटले.
३0 डिसेंबरपर्यंत वापरू द्या त्या जुन्या नोटा-
आगरतळा : बाद झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा लोकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी ३० डिसेंबरपर्यंत वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
कार्ड पेमेंटवरचा अधिभार नको -
नवी दिल्ली : क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे करण्यात आलेल्या पेमेंटवर लावण्यात आलेला अधिभार बेकायदेशीर ठरविण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटिसा बजावण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिले.