म्हणे, टागोरांनी ‘नोबेल’ परत केला; मुख्यमंत्र्यांची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:34 AM2018-05-12T03:34:26+5:302018-05-12T03:34:26+5:30
मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी आता कार्यक्रमात चक्क थाप मारली.
आगरतळा : मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी आता कार्यक्रमात चक्क थाप मारली. थोर बंगाली साहित्यिक कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधासाठी इंग्रजांनी दिलेला नोबेल पुरस्कार परत केला, अशी खोटी माहिती दिली.
मुख्यमंत्री देव म्हणाले की, जालियनवाला बागेत झालेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांनी दिलेला नोबेल पुरस्कार तर परत केलाच, पण इंग्रजांनी त्यांना जो ‘नाइटहूड’ पुरस्कार दिला होता, तोही त्यांनी परत केला. प्रत्यक्षात नोबेल पुरस्कार स्वीडिश अॅकेडमीतर्फे दिला जातो व रवींद्रनाथांनी तो परतही केला नव्हता. त्यांनी नाइटहूड पुरस्कार मात्र परत केला होतो. तो पुरस्कार त्यांना ब्रिटिशांकडून देण्यात आला होता.
याआधीही महाभारताच्या काळात इंटरनेट होते, तरुणांनी नोकरीच्या मागे लागण्याऐवजी गुरे राखावीत वा पानटपऱ्या सुरू कराव्यात, असा सल्लाही देव यांनी दिला होता.