नववर्षात 'एसबीआय'कडून स्वस्त कर्जांचं गिफ्ट, आयडीबीआय, युनियन बँकेकडून व्याजदरात कपात
By admin | Published: January 1, 2017 04:35 PM2017-01-01T16:35:32+5:302017-01-01T18:50:14+5:30
भारतीय स्टेट बँक (एसबीआय)नं नव्या वर्षात नव्या ग्राहकांसाठी स्वस्त कर्जाचं गिफ्ट दिलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - नोटाबंदीनंतर बँकांत मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना करून देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर आता एसबीआय, आयडीबीआय, युनियन बँकेकडून कर्जाच्या आधारभूत दरात ०.९० टक्के कपात करण्यात आली आहे. याचे अनुकरण अन्य बँकांकडूनही होण्याची शक्यता आहे. २००८ नंतरच्या जागतिक मंदीनंतरची ही सर्वात मोठी व्याजदर कपात समजली जात आहे. नवे दर १ जानेवारीपासून लागू असतील.
या निर्णयानंतर आधारभूत दर आता ८.६५ टक्क्यांवरुन आता ७.७५ टक्के झाले आहेत. एका वर्षाच्या कर्जासाठी हे दर ८.९० टक्क्यांवरुन ८ टक्के झाले आहेत. दोन वर्षांच्या कर्जासाठी हे दर ८.१० टक्के तर तीन वर्षांच्या कर्जासाठी ८.१५ टक्के झाले आहेत.
विविध बँकांकडून कर्जाच्या आधारभूत दरात (एमसीएलआर) कपातीस सुरुवात होऊ शकते. शुक्रवारी आयडीबीआय आणि स्टेट बँक आॅफ त्रावणकोर यांनी एमसीएलआरमध्ये १५ ते ४० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. अन्य बँकांकडूनही असे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. अर्थात, अनेक बँकांकडून आता ठेवीवरील व्याज दरातही कपात केली जाऊ शकते. आगामी काळात जे होम लोन किंवा अन्य कर्ज घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे शुभ संकेत आहेत. बँकींग क्षेत्राचा इतिहास पाहिला तर असे दिसते की, इतक्या कमी काळात बँकात मोठ्या प्रमाणात निधी प्रथमच जमा झाला आहे.
एसबीआयचे गृह कर्ज आता महिलांसाठी ८.२० टक्क्यांनी तर, इतरांसाठी ८.२५ टक्क्यांनी मिळणार आहे. युनियन बँक आॅफ इंडियाने कर्जाच्या आधारभूत दरात ६५ बेसिस पॉइंटने कपात केली आहे. हे दर आता ८.६५ टक्के असतील. आयडीबीआय आणि स्टेट बँक आॅफ त्रावणकोरने कर्ज दरात कपात केली असून हे दर आता ८.९० ते ९.३० टक्के असणार आहेत. नोटाबंदीनंतर बँकांकडे १४.९ लाख कोटी रुपयांचे डिपॉझिट आले आहे.
कर्जाचा दर घटवल्यामुळे आता गृह कर्ज, रिक्षा कर्ज आणि व्यक्तिगत कर्ज स्वस्त होणार आहे. जानेवारी २०१५पासून आतापर्यंत एसबीआयनं कर्जाचा दर २०० बेसिस पॉइंटनं कमी केला आहे. ओव्हरनाइट बॉरोइंगवर एमसीएलआर ८.६५ टक्क्यांवरून घसरून ७.७५ टक्के झाला आहे. तीन वर्षांसाठी कर्ज घेतल्यास एमसीएलआर ९.०५ टक्क्यांवरून घसरून ८.१५ टक्के इतका घसरला आहे.