‘फ्युचर गेमिंग’ची १३६८ कोटींची रोखे खरेदी; TMCला ५४० कोटी, काँग्रेस किती कोटीचा लाभार्थी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:01 PM2024-03-22T12:01:44+5:302024-03-22T12:03:09+5:30
Electoral Bond: वेदांत, भारती एअरटेल, मुथूट, बजाज ऑटो, जिंदाल ग्रुप आणि टीव्हीएस मोटर यांसारख्या बड्या कंपन्यांकडून भाजपाला मोठा निधी मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.
Electoral Bond: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज भारतीय स्टेट बँकेने विविध राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांंशी संबंधित सर्व माहिती भारतीय निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर काही तासातच निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध केली. 'फ्युचर गेमिंग' एकूण १ हजार ३६८ कोटींची रोखे खरेदी केल्याची माहिती मिळाली असून, तृणमूल काँग्रेसला ५४० कोटींची देणगी दिल्याचे समोर आले आहे.
संपूर्ण तपशील उपलब्ध झाल्यामुळे आता कोणत्या देणगीदाराने कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या तारखेला किती निवडणूक निधी दिला हे उघड झाले आहे. एसबीायने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यासंदर्भातील माहिती जाहीर केली. वेदांत, भारती एअरटेल, मुथूट, बजाज ऑटो, जिंदाल ग्रुप आणि टीव्हीएस मोटर यांसारख्या बड्या कंपन्यांकडून भाजपला मोठा निधी मिळाला आहे. वेदांत समूहाने भाजप काँग्रेस, बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसला, भारती एअरटेलने भाजप, राष्ट्रीय जनता दल, शिरोमणी अकाली दल, काँग्रेस, जनता दल (संयुक्त) यांना तर मुथूट यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांना देणग्या दिल्या.
तृणमूल काँग्रेस 'फ्युचर गेमिंग'चा सर्वात मोठा लाभार्थी
'फ्युचर गेमिंग' ने देशभरातील बहुतेक राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत. ५४० कोटी रुपयांची देणगी मिळविणारा तृणमूल काँग्रेस 'फ्युचर गेमिंग'चा सर्वात मोठा लाभार्थी आहे. भाजप, काँग्रेस, द्रमुक, वायएसआर काँग्रेस या पक्षांनाही राजकीय देणग्या देण्यात आल्या आहेत.
सिक्कीममधील राजकीय पक्षांना १० कोटींपेक्षा कमी रक्कम
राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या 'फ्यूचर गेमिग'ने १,३६८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. या कंपनीने द्रमुकला ५०९ कोटी, वायएसआर काँग्रेसला १६० कोटी, भाजपला १०० कोटी आणि काँग्रेसला ५० कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या सिक्कीममधील राजकीय पक्षांना १० कोटींपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे.
शिवसेनेला २५ कोटी रुपये दिले
हैदराबादस्थित मेघा इंजिनिअरिंग हा दुसरा सर्वांत मोठा देणगीदार आहे. कंपनीने १९६६ कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले असून भाजप, भारत राष्ट्र समिती आणि द्रमुक त्याचे लाभार्थी आहेत. 'क्विक सप्लाय' या कंपनीने ४१० कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केले असून भाजपला ३९५ कोटी आणि शिवसेनेला २५ कोटी रुपये दिले, 'क्विक सप्लाय'च्या कार्यालयाचा नोंदणीकृत पत्ता नवी मुंबईतील चीरूभाई अंबानी नॉलेज सिटी येथील आहे.
दरम्यान, उद्योगपती लक्ष्मी निवास मित्तल यांनी भाजपला देणगी दिली, तर बायोकॉनचे प्रमुख किरण मुझुमदार शॉ यांनी भाजप, तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला देणगी दिली. रुंगटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडने काँग्रेस, भाजपा, तृणमूल काँग्रेस आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाला देणगी दिली.