SBI Fraud : सहा महिन्यांत एसबीआयला तब्बल 5,555 कोटींचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:19 PM2018-10-10T12:19:23+5:302018-10-10T12:20:26+5:30
वर्षभरात मोठमोठे बँक घोटाळे उघडकीस आले. मात्र, घोटाळेबाज देशातून सहीसलामत फरारही झाले. यातून भारतीय बँक व्यवस्था सावरलेली नसतानाच देशाच्या सर्वात मोठ्या बँकेमध्येही साडे पाच हजार कोटींचा घोटाळा उघड झाला आहे.
नवी दिल्ली : वर्षभरात मोठमोठे बँक घोटाळे उघडकीस आले. मात्र, घोटाळेबाज देशातून सहीसलामत फरारही झाले. यातून भारतीय बँक व्यवस्था सावरलेली नसतानाच देशाच्या सर्वात मोठ्या बँकेला गेल्या सहा महिन्यांत तब्बल 5,555.48 कोटींना ठकविण्यात आले आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयमध्ये हे घोटाळे झाले आहेत. एप्रिल ते जूनदरम्यान 669 प्रकरणांमध्ये 723.06 कोटींची अफरातफर झाली. तर जुलै ते सप्टेंबरमध्ये 660 प्रकरणे समोर आली आहेत. या घोटाळ्यांची रक्कम 4832.42 कोटी रुपये एवढी आहे. या तीन महिन्यांत 9 घोटाळे कमी झाले असले तरीही रक्कम मात्र 568.33 टक्क्यांनी वाढली आहे.
मध्यप्रदेशचे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी ही माहिती मिळविली आहे. त्यांनी घोटाळ्यामुळे बँकेला किती रुपयांचे नुकसान झाले याची माहिती मागितली होती. मात्र, बँकेने याबाबत अंदाज लावता येणार नसल्याचे सांगितले आहे. तर एसबीआयचे ग्राहकही या नुकसानाबाबत अंधारातच आहेत. तसेच अशी माहिती माहिती अधिकारात देता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.