विजय मल्ल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा एसबीआयने केला इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:26 PM2018-09-14T23:26:01+5:302018-09-14T23:26:23+5:30
फेब्रुवारी २0१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊन विजय मल्ल्या याच्या विदेश गमनावर कायदेशीर बंधन आणण्याचा सल्ला एसबीआयला देण्यात आला होता.
नवी दिल्ली : आर्थिक घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या मालकीच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाशी संबंधित खटल्यात आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्याचा स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) इन्कार केला आहे.
किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज देणाऱ्या बँक समूहाचे नेतृत्व एसबीआयनेच केलेले आहे. किंगफिशरचे कर्ज थकल्यानंतर विजय मल्ल्या विदेशात पळून जाऊ शकतो, अशी भीती त्यावेळी जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत होती. याची दखल घेत फेब्रुवारी २0१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊन विजय मल्ल्या याच्या विदेश गमनावर कायदेशीर बंधन आणण्याचा सल्ला एसबीआयला देण्यात आला होता. परंतु तो सल्ला एसबीआयने मानला नाही.
२ मार्च २0१६ रोजी विजय मल्ल्याने भारत सोडला. तो विदेशात पळून गेल्यानंतर चार दिवसांनी बँकेने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करून त्याला विदेशी जाण्यापासून रोखण्यात यावे, अशी विनंती केली. एसबीआयच्या या भूमिकेकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जात आहे.
याप्रकरणी एसबीआयने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, किंगफिशर एअरलाइन्ससह विजय मल्ल्या
यांच्या विरोधातील सर्व कर्ज थकबाकीच्या प्रकरणात बँकेकडून अथवा बँकेच्या अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही. विजय मल्ल्याने भारतातील १७ बँकांच्या समूहाचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. त्यावरून त्याच्याविरुद्ध अनेक खटले सुरू आहेत.
थकबाकी असताना कर्ज कसे दिले?
विजय मल्ल्या यांनी कर्जाच्या थकबाकीस आपण एकटेच जबाबदार नसून कर्ज देणाºया बँकाही जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे. आपल्या कंपन्यांची स्थिती बँकांना माहिती होती.
तरीही कर्जथकबाकीप्रकरणी आपल्याला एकट्यालाच जबाबदार धरून बँकांनी आपल्याला ‘पोस्टर बॉय’ केले आहे, असे मल्ल्या यांनी म्हटले आहे. दरम्यान, मल्ल्या यांना कर्ज दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही बँकांवर ताशेरे आढले आहेत. आधीची कर्जे थकलेली असताना मल्ल्या यांना पुन्हा कर्ज कसे काय दिले गेले, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.