SBI Vs Farmer: शेतकऱ्याला नडला त्याला...! एसबीआयने ३१ पैशांसाठी एनओसी अडविली; उच्च न्यायालयात पोहोचला, पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 11:49 AM2022-04-28T11:49:11+5:302022-04-28T11:49:34+5:30
SBI Vs Farmer on 31 Paisa Charge: कृषी कर्जाची सर्व रक्कम त्या शेतकऱ्याने भरली होती. ते उरलेले ३१ पैसे देखील भरले तरीही बँकेने अडून दाखविले, मल्ल्या, मोदी, चोकसी पळाले त्याचे काय...
एकीकडे हजारो कोटींची कर्जे घेऊन विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी सारखे भामटे एसबीआयसारख्या बड्या बँकांना चुना लावून परदेशात पळाले आहेत आणि हीच एसबीआय सामान्य माणसांना, शेतकऱ्यांना नाडू लागली आहे. गुजरातमध्ये संताप आणणारा प्रकार घडला आहे. कर्जाचे ३१ पैसे थकीत दाखवून एका शेतकऱ्याला या बँकेने एनओसी दिली नाही, भरले तरी दिली नाही, यामुळे हा शेतकरी आता बँकेलाच नडला आहे. थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हाय कोर्टाने यावर एसबीआयला चांगलेच सुनावले आहे. बँकेने शेतकऱ्याला नो ड्यूज सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. कृषी कर्जाची सर्व रक्कम त्या शेतकऱ्याने भरली होती, यामध्ये त्याच्या नावावर फक्त ३१ पैसे थकीत दिसत होते. या शेतकऱ्याने त्याची जमीन विकली, परंतू बँकेने त्याला एनओसी देण्यास नकार दिला आणि हे प्रकरण चिघळले.
शेतकरी आणि त्याच्या जमिनीचा खरेदीदार उच्च न्यायालयात पोहोचले. बँकेने न्यायालयाला कृषी कर्जावरील रक्कम भरली, परंतू त्याच्या नावावर ३१ पैसे थकीत दिसत आहेत. यामुळे एनओसी दिली नाही असे कारण सांगितले. यावर न्यायमूर्ती भार्गव करिया यांनी हे खूपच अती झाले, असे म्हणत एवढ्या क्षुल्लक रकमेसाठी नो ड्यूज सर्टिफिकीट न देणे हा एकप्रकारचा अत्याचारच आहे, अशा शब्दांच नाराजी व्यक्त केली. तसेच ५० पैशांपेक्षा कमी रक्कम असेल तर तिकडे एवढे लक्ष दिले जात नाही, हे तुम्हाला माहिती नाही का? अशा शब्दांच उच्च न्यायालयाने बँकेला झापले आहे. तसेच बँकेकडून यावर उत्तर मागितले असून अॅफिडेविट जमा करायला सांगितले आहे. या प्रकरणावर आता दोन मे रोजी सुनावणी होणार आहे.
शेतकऱ्याने ते ३१ पैसेही भरले...
राकेश वर्मा आणि मनोज वर्मा यांनी खोराज गावच्या संभाजी पाशाभाई यांच्याकडून शेतजमीन खरेदी केली होती. ही जमीन अहमदाबाद शहराच्या बाहेर आहे. पाशाभाई यांनी एसबीआयकडून कृषी कर्ज घेतले होते. ते फेडलेही. परंतू त्यांच्या नावावर ३१ पैसे शिल्लक असल्याचे दिसत होते. हा बँकेना लावलेला चार्ज होता. २०२० मध्ये ते न्यायालयात गेले, तसेच बँकेत जाऊन त्यांनी ते ३१ पैसे देखील भरले. परंतू तरीही बँकेने त्यांना एनओसी देण्यास नकार दिला.