SBIचं गृह कर्ज झालं स्वस्त
By Admin | Published: May 8, 2017 03:27 PM2017-05-08T15:27:38+5:302017-05-08T18:02:38+5:30
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयनं स्वतःच्या गृह कर्जाच्या दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. एसबीआयनं 30 लाखांचे गृह कर्ज 0.25 टक्क्यांनी घटवलं आहे. त्यामुळे आता घर घेण्यासाठी 30 लाखांचं कर्ज घेतल्यास ग्राहकांना त्यावर 8.35 टक्के व्याज द्यावं लागणार आहे. यापूर्वी एसबीआयच्या गृहकर्जदारांना 8.60 टक्क्यांपर्यंत व्याज द्यावं लागतं होतं.
एसबीआयनं या कमी रकमेच्या गृहकर्जावरच ही व्याजदर कपात केली नाही, तर 30 लाखांहून अधिकच्या गृहकर्जावरही व्याजदर कपात केली आहे. 30 लाख रुपयांहून अधिकच्या रकमेवरही व्याजदरातही 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवं घर घेणा-या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. नवे व्याजदर 9 मेपासून 31 जुलैपर्यंत लागू राहतील. एसबीआयनं आतापर्यंत 2.23 लाख कोटींचं कर्ज वितरीत केलं आहे. त्यामुळे त्यांचा बाजारातील समभाग 25 ते 26 टक्क्यांपर्यंत आहे. मात्र आता गृह कर्ज 0.25 टक्क्यांनी स्वस्त केल्यानं त्याचा बाजारातील समभाग 45 टक्क्यांपर्यंत झेपावण्याची शक्यता आहे.
(नववर्षात "एसबीआय"कडून स्वस्त कर्जांचं गिफ्ट)
महिला ग्राहकांना एसबीआय 8.35 टक्के दर आकारणार आहे. यामुळे दर महिन्याच्या हप्त्यामध्ये तब्बल 529 रुपयांपर्यंत बचत होऊ शकेल. बँकेचे नवे दर इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक कमी आहेत. पुरुष कर्जदार असल्यास त्याच्यासाठी 31 जुलैपर्यंत ही योजना लागू असेल. नोकरदार पुरुष गृहखरेदीदारास 0.20 टक्के कमी व्याजदराने कर्ज मिळेल. बिगर नोकरदारांसाठी हे व्याजदर 0.15 टक्के होतील. म्हणजे नोकरदार वर्गास 8.40 टक्के दराने कर्ज मिळेल, असे एसबीआयचे राष्ट्रीय बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक रजनिश कुमार यांनी सांगितले. या नव्या योजनेची अंमलबजावणी मंगळवारीपासून होणार आहे.