‘एसबीआय’ची यूपीआय, ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प; ५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 06:14 IST2025-04-02T06:14:13+5:302025-04-02T06:14:38+5:30
SBI UPI: स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग सेवा मंगळवारी ठप्प झाली. दिवसभर ५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी याबाबत अधिकृत तक्रारी दाखल केल्या.

‘एसबीआय’ची यूपीआय, ऑनलाइन बँकिंग सेवा ठप्प; ५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी दाखल
नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) यूपीआय आणि ऑनलाइन बँकिंग सेवा मंगळवारी ठप्प झाली. दिवसभर ५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी याबाबत अधिकृत तक्रारी दाखल केल्या.
‘डाउनडिटेक्टर’ने जारी केलेल्या माहितीनुसार, सकाळी ०८:०० वाजेपासूनच वापरकर्त्यांना ऑनलाइन बँकिंग सेवा वापरण्यात अडथळे येत होते. असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दुपारी १२:०० वाजता एसबीआयने ‘एक्स’वर एक पाेस्ट टाकली. त्यात बँकेने म्हटले की, वार्षिक ताळेबंदाचे काम सुरू असल्यामुळे १ एप्रिल रोजी दुपारी ०१:०० ते ०४:०० या वेळेत ऑनलाइन बँकिंग सेवा चालणार नाही. वापरकर्त्यांनी पैसे काढण्यासाठी, तसेच हस्तांतरित करण्यासाठी एटीएम आणि यूपीआय लाइटचा वापर करावा.
६४% ग्राहकांना अडचणी
‘डाउनडिटेक्टर’नुसार, सर्वाधिक ६४ टक्के वापरकर्त्यांना मोबइल बँकिंग सेवेत अडचणी येत होत्या. ३२ टक्के ग्राहकांना पैसे हस्तांतरणात, तर ४ टक्के ग्राहकांना एटीएम सेवा वापरण्यात अडथळे येत होते.दरम्यान, याआधी २६ मार्च रोजी देशातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा सुमारे अडीच तास ठप्प झाली होती. यावेळी लोकांना गूगल पे, फोन पे आणि पेटीएम यांसारख्या ॲपवरून पैसे हस्तांतरित करण्यात अडथळे आले. १० पेक्षा जास्त बँकांच्या यूपीआय सेवा यात ठप्प झाल्या होत्या.