वाजवा रे वाजवा... फटाके फोडण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिली 'गुड न्यूज'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:49 PM2018-10-30T16:49:38+5:302018-10-30T16:50:35+5:30
दिवाळीदरम्यान फटाक्यांचा धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली होती.
नवी दिल्ली - दिवाळीतफटाके फोडण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. कारण, फटाके उडविण्याची वेळ ठरविण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला दिला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या म्हणजेच रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडणे बंधनकारक नसणार आहे. त्यामुळे, आता राज्य सरकारने ठरवल्यास, अभ्यंग स्नानानंतर फटाके वाजवा रे वाजवा म्हणता येईल.
फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात काहीसा बदल केला आहे. त्यामुळे दिवाळीत अभ्यंग स्नानाला फटाके फोडण्याची मुभा मिळू शकते. कारण, बदललेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने फटाके फोडण्याच्या वेळेसंदर्भात निर्णय घ्यावा, असे कोर्टाने सूचवले आहे. फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी यापूर्वी सुप्रीम कोर्टानं रात्री 8 ते 10 पर्यंतची वेळ ठरवून दिली होती. त्यात, काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे.
दिवाळीदरम्यान फटाक्यांचा धूर आणि आवाजामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी कमी प्रदूषण करणारे फटाके फोडण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली होती. पण, त्यासाठी वेळही ठरवून देण्यात आली होती. त्यानुसार, दिवाळीला संध्याकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडता येतील. तर, इतर सणांसाठी म्हणजेच नवीन वर्ष, नाताळ यासाठी रात्री 11.55 pm ते 12.30 am या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने आपल्या निर्णयात बदल केला असून दिवाळीसाठी राज्य सरकार फटाके फोडण्याबाबतची वेळ ठरवू शकेल, असे कोर्टाने म्हटले आहे. पण, एक दिवसात केवळ दोनच तास फटाके फोडता येतील, हेही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, आता महाराष्ट्र सरकार फटाके फोडण्यासाठी नेमकी कोणती वेळ ठरवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर, काही आमदार आणि खासदारांनी आपण फटाके फोडणारच असा आग्रहदेखील बोलून दाखवला होता.