अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, आता 5 डिसेंबरला होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 05:33 PM2017-08-11T17:33:13+5:302017-08-11T17:33:21+5:30

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.

SC postpones Ayodhya title dispute case hearing to December 5 | अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, आता 5 डिसेंबरला होणार सुनावणी

अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, आता 5 डिसेंबरला होणार सुनावणी

नवी दिल्ली, दि. 11 - अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीत दस्तावेज आणि जबाब नोंदवण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला 12 आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे. या प्रकरणात आता कोणत्याही पक्षकाराला मुदत वाढवू देण्यात येणार नाही. तसेच या प्रकरणाला स्थगिती देणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अयोध्या आणि बाबरी मशिदी वादाच्या प्रकरणात 9 हजार पानांचे दस्तावेज, पाली, संस्कृत, अरब या भाषांसह विविध भाषांमध्ये जवळपास 90 हजार पानांमध्ये जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्या प्रकरणात या जबाबांची शहानिशा करण्याची सुन्नी वक्फ बोर्डानं मागणी केली आहे. 
गेल्या काही दिवसांपूर्वी अयोध्येत मंदिर तोडल्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. बाबरी मशिदीच्या मालकी हक्काची कायदेशीर लढाई हारल्यानंतर तब्बल 71 वर्षानंतर शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 30 मार्च 1946 रोजी ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या निर्णयाला शिया वक्फ बोर्डाने आव्हान दिलं होतं, ज्यामध्ये मशिदीला सुन्नी वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत शिया वक्फ बोर्डाने सांगितलं आहे की, 'बाबरी मशीद बांधण्यासाठी त्याठिकाणी असलेलं मंदिर नष्ट करण्यात आलं होतं'. 
याचिका दाखल करण्याच्या एक दिवस आधी शिया वक्फ बोर्डाने वाद मिटवण्यासाठी मशीद दुस-या ठिकाणी बांधण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं होतं. अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदची जागा आमच्या मालकीची असून तिथं राम मंदिर बांधू द्यायला आमची हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. राम जन्मभूमीपासून काही अंतरावर जिथे मुस्लिमांची वस्ती आहे, तिथं मशिद बांधावी अशी भूमिकाही बोर्डाने घेतली होती.

ही मशीद शिया मुस्लिमाने बांधली होती त्यामुळे ट्रायल कोर्टाने बाबरी मशीद सुन्नी वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचा दिलेला निर्णय चुकीचा असल्याचं याचिकेतून सांगण्यात आलं आहे. मोगल बादशहा बाबरने या मशिदीची बांधकाम केलं होतं, या माहितीला बोर्डाने आव्हान दिलं असून बाबरच्या एका मंत्र्याने अब्दुल मीर बाकी याने आपल्या पैशांनी ही मशीद बांधली होती असं बोर्डाने सांगितलं आहे. अब्दुल मीर बाकी शिया मुस्लिम होता, तर बाबर सुन्नी मुस्लिम अशी माहितीही देण्यात आली होती. 

Web Title: SC postpones Ayodhya title dispute case hearing to December 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.