Assembly Election Result 2022: घोटाळ्यांनी बरबटलेले लोक भ्रष्टाचारविरोधी कारवाई करणाऱ्या संस्थांना बदनाम करतायत, मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 09:26 PM2022-03-10T21:26:41+5:302022-03-10T21:28:58+5:30
Assembly Election Result 2022 : मोदी म्हणाले, देशाच्या पैशांवर डल्लामारून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये तयार झाली आहे. देशातील जनतेना आम्हाला संधी दिली. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहेत. मोदी सरकारच भ्रष्टाचार कमी करू शकते, अशी आशा जनतेला आहे.
नवी दिल्ली - देशातील काही लोक भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहत आहात, की ज्या संस्था भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करत आहेत, हे लोक आणि त्यांचे इकोसिस्टिम, त्या संस्थांनाच बदनाम करण्यासाठी मैदानात येत आहेत. घोटाळ्याने बरबटलेले हे लोक एकत्रित येऊन, आपल्या इकोसिस्टिमच्या मदतीने या संस्थांवर दबाव टाकत आहे, हे देशाचे दुर्दैव आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आज विरोधकांवर हल्ला चढवला. ते दिल्ली येथील भजपच्या मुख्यालयातून बोलत होते.
आज देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल (Assembly Election Result 2022) जाहीर झाले. यांपैकी पंजाब वगळता चार राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाले. विशेष म्हणजे या चारही राज्यांत जनतेने भाजपला पुन्हा संधी दिली. भाजपच्या या चारही राज्यांतील बंपर विजयानंतर आज भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना आणि देशातील जनतेला संबोधित केले.
यावेळी, मला सांगा, भष्टाचाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी की नको? असा सवाल करत मोदी म्हणाले, देशाच्या पैशांवर डल्लामारून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये तयार झाली आहे. देशातील जनतेना आम्हाला संधी दिली. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहेत. मोदी सरकारच भ्रष्टाचार कमी करू शकते, अशी आशा जनतेला आहे.
हे लोक, तपास संस्थांवर दबाव टाकण्यासाठी आपल्या इको सिस्टिमच्या माध्यमाने नव-नव्या पद्धती शोधून काढतात. यांना न्यायपालिकांवरही विश्वास नाही. आधी हजारो कोटींचा घोटाळा करायचा, तपासही होऊ द्यायचा नाही आणि होत असेलच तर संबंधित संस्थांवर दबाव टाकायचा, अशी या लोकांची पवृत्ती झाली आहे. एवढेच नाही, तर हे लोक एखाद्यावर कारवाई झाली, की त्याला एखाद्या जातीशी अथवा संप्रदायाशी जोडतात. मी लोकांना आवाहन करतो की, अशा भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या जातीपासून, संप्रदायापासून वेगळ करा. यामुळे समाजाचे कल्याण होईल, असेही मोदी म्हणाले.
उत्तर प्रदेशात आमच्या विजयाचे कारण हेही आहे, की येथील लोकांनी असे राजकारण सहन केले आहे. येथील लोकांच्या प्रेमाने मलाही उत्तर प्रदेशचे बनविले आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की, जातींना, संप्रदायांला बदनाम करणाऱ्यांपासून दूर रहायचे आणि राज्याच्या विकासालाच प्राधान्य द्यायचे, हे या लोकांनी निश्चित केले आहे, असेह मोदी यावेळी म्हणाले.