घोटाळेबाजांनी लाटले सरकारचे ४ हजार कोटी; पीएम किसान सन्मान निधी योजनेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 09:30 AM2022-10-07T09:30:32+5:302022-10-07T09:31:56+5:30
या घोटाळ्याची फारशी चर्चा मात्र झाल्याचे दिसून आलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : फेब्रुवारी २०१९मध्ये सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेत अपात्र शेतकऱ्यांनी अथवा शेतकरी असल्याचे भासविणाऱ्या घोटाळेखोरांनी सरकारचे तब्बल ४ हजार कोटी रुपये लाटले आहेत. या घोटाळ्याची फारशी चर्चा मात्र झाल्याचे दिसून आलेले नाही.
पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची थेट मदत दिली जाते. तथापि, या योजनेसाठी प्रत्येक शेतकरी पात्र लाभार्थी नाही. अंतिम यादी मंजूर करण्याचे अधिकार काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या हातात आहेत. या यादीत बनावट व अपात्र शेतकऱ्यांची नावे मोठ्या प्रमाणात घुसविण्यात आल्याचे नंतर लक्षात आले. सरकारने डेटा बेसची तपासणी केली आणि अपात्र शेतकरी लाभार्थ्यांची नावे शोधून काढली. या बनावट शेतकऱ्यांनी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचा निधी लाटल्याचे तपासणीत आढळून आले.
घोटाळेखोरांनी बनावट आधारकार्ड बनवून बँकेत खाती उघडत योजनेचे पैसे लाटले. आधार बंधनकारक नसलेल्या आसामसारख्या राज्यात शेतकऱ्यांनी अनेक बँक खाती उघडून जास्तीचे लाभ पदरात पाडून घेतले.
कुणाच्या नावाने उचलले पैसे?
या योजनेत सुरूवातीला एवढी बनवेगिरी झाली की, घोटाळेखोरांनी रामभक्त हनुमान, अभिनेता रितेश देशमुख, आएसआयचा गुप्तहेर मेहबूब राजपूत (अख्तर) यांच्या नावेही पैसे उचलण्यात यश मिळवले.
कुठे किती शेतकरी अपात्र?
राज्य अपात्र किती लाटले
आसाम ८.३५लाख ५५८कोटी
तामिळनाडू ६.९७लाख ३२१कोटी
कर्नाटक ४लाख ४४०कोटी
उत्तर प्रदेश २१लाख २,३०० कोटी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"