तेलंगणात घोटाळेच घोटाळे; सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 06:24 AM2023-11-21T06:24:03+5:302023-11-21T06:24:23+5:30
गृहमंत्री शाह : सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हैदराबाद : तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले. त्यात प्रामुख्याने कालेश्वरम प्रकल्प, दारू घोटाळा व मियापूर येथील जमीन गैरव्यवहाराचा समावेश आहे. तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास सर्व घोटाळे बाहेर काढून त्याची चौकशी केली जाईल आणि भ्रष्ट लोकांना तुरुंगात टाकले जाईल, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
जनगाव येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह यांनी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) राजवटीतील विविध कथित घोटाळ्यांचा उल्लेख केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत आघाडीवर आहे. सत्तेत आल्यास कलेश्वरम व धरणीसह विकासाच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या चौकशीसाठी आयोग नेमला जाईल, असेही शाह यांनी म्हटले.
अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार : केसीआर
तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात साळीचे उत्पादन करण्यात यश आले आहे, जर बीआरएस पुन्हा सत्तेत परत आला, तर सर्वत्र अन्नप्रक्रिया उद्योग उभारले जातील. स्थानिक तरुणांसाठी ते रोजगाराचे साधन बनतील, असे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सोमवारी सांगितले.
मानकोंडूर येथील निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना केसीआर बोलत होते. वाहनांची ‘फिटनेस प्रमाणपत्र’ प्रणाली रद्द करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ऑटोरिक्षा चालकांना दरवर्षी हे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले की, हा तोच पक्ष होता, ज्याने तेलंगणाचे आंध्र प्रदेशात (१९५०च्या दशकात) लोकांच्या इच्छेविरुद्ध विलीनीकरण केले होते.