संसदेच्या दोन्ही सभागृहात हक्कभंग प्रस्तावांचा गदारोळ
By Admin | Published: March 3, 2016 01:57 AM2016-03-03T01:57:14+5:302016-03-03T01:57:14+5:30
काँग्रेस-भाजप यांच्यात जुंपली
क ँग्रेस-भाजप यांच्यात जुंपलीविशेष प्रतिनिधीनवी दिल्ली : संसदेच्या उभय सभागृहात मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावरून बुधवारी काँग्रेस आणि भाजपमधे तुफान खडाजंगी झाली. काँग्रेस या प्रस्तावाबाबत मंगळवारपासून आग्रही आहे. प्रत्युत्तरादाखल भाजपने लोकसभेत ज्योतिरादित्य शिंदे तर राज्यसभेत जद (यु)च्या के.सी. त्यागींविरूध्द हक्कभंग प्रस्ताव दाखल करून या गदारोळात आणखी भर घातली आहे.सभागृहात स्मृती इराणींवरील हक्कभंग प्रस्तावामुळे अडचणीत सापडलेल्या भाजपच्या मदतीला अण्णाद्रमुकचे सदस्य ठामपणे उभे राहिले आहेत. गेले दोन दिवस उभय सभागृहात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची एअरसेल मॅक्सिस प्रकरणी चौकशी करण्याच्या मागणीवरून अद्रमुक सदस्यांनी तुफान गोंधळ घातला. बुधवारी राज्यसभेत या गोंधळामुळे शून्यप्रहराचे कामकाजही होउ शकले नाही. अण्णाद्रमुकचे नवनीतकृष्णन यांची मागणी फेटाळतांना उपसभापती कुरियन म्हणाले, सदर विषयासाठी उचित नोटीस दिल्याशिवाय हा विषय तुम्हाला सभागृहात मांडता येणार नाही. तरीही गदारोळ थांबला नाही अखेर राज्यसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले.राज्यसभेत गुजराथच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलांच्या कन्या अनार पटेल व त्यांच्या भागीदारांना कवडीमोल किमतीत गीर अभयारण्याजवळची जमीन ॲलॉट करण्याचा मुद्दा, काँग्रेसचे प्रमोद तिवारी मांडू इच्छित होते मात्र सभागृहातील गदारोळामुळे त्यांना तो मांडता आला नाही. लोकसभेत इशरत जहां प्रकरणावरून भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, सुरूवातीला लष्करची वेबसाईट, त्यानंतर डेव्हिड हेडलीचे निवेदन आणि आता अंतर्गत सुरक्षेचे माजी गृहसचिव यांचा खळबळजनक खुलासा यामुळे संसदेत इशरत जहां प्रकरणी चर्चा झाली पाहिजे, असे मला वाटते. भाजपच्या भूपेंद्र यादवांनी याच मुद्यावर राज्यसभेत लक्षवेधी सुचना दाखल केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मात्र इशरत प्रकरणी चिदंबरम यांचा बचाव केला आहे. त्या म्हणाल्या, चिदंबरम पूर्वीच म्हणाले होते की इशरत प्रकरणी सत्ताधार्यांतर्फे आपल्यावर जाणीवपूर्वक हल्ला चढवला जाईल. आज तेच घडते आहे. अशाप्रकारे लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात तर राज्यसभेत शून्यप्रहरात विविध विषयांवर उभय पक्षांनी घोषणाबाजी करीत परस्परांवर शरसंधान केले. लोकसभेतल्या घोषणाबाजीमुळे अध्यक्षा सुमित्रा महाजन बर्याच व्यथित झाल्या होत्या. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे सौगत राय,सुदिप बंदोपाध्याय आदींनी काँग्रेसची पाठराखण केल्यानंतर गटनेते खरगेंना हक्कभंग प्रस्तावाचे प्रास्ताविक अध्यक्षांनी करू दिले.