भयावह! ओडिशामध्ये दोन तासांत 61000 वेळा वीज कोसळली; पुढील ४८ तास महत्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 09:47 AM2023-09-04T09:47:03+5:302023-09-04T09:47:28+5:30
मान्सून दीर्घ कालावधीनंतर सामान्य स्थितीत परत येतो, तेव्हा अशी असामान्य स्थिती बनते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजा कोसळतात.
ओडिशामध्ये जगाला हैरान करणारी घटना घडली आहे. दोन तासांत तब्बल ६१००० वेळा आकाशातून वीज कोसळली आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. ओडिशा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांच्या नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. परंतू, पुढील ४८ तासांच्या तांडवासाठी देखील तयारी केली आहे.
ओडिशातील हवामान खराब आहे. आयएमडीने सात सप्टेंबरपर्यंत खराब हवामानाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावर सक्रिय असलेले चक्रीवादळ पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात बदलू शकते आणि त्याच्या प्रभावाखाली ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
ओडिशात एकापाठोपाठ एक 61000 वेळा वीज कोसळली. यापुढेही अशा घटना घडू शकतात, असे आयएमडीने म्हटले आहे, असे विशेष मदत आयुक्त (SRC) सत्यब्रत साहू यांनी सांगितले. मान्सून दीर्घ कालावधीनंतर सामान्य स्थितीत परत येतो, तेव्हा अशी असामान्य स्थिती बनते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजा कोसळतात. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारपर्यंत पुढील ४८ तासांत उत्तर ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.