बंदरे रेल्वेशी जोडण्यासाठी १८ हजार कोटींची योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:55 AM2018-06-25T02:55:40+5:302018-06-25T02:55:43+5:30
बंदरे रेल्वे जाळ्याशी जोडून माल आणि अन्य वस्तूंचा परिवहन खर्च कमी करण्यासाठी इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशनने
नवी दिल्ली : बंदरे रेल्वे जाळ्याशी जोडून माल आणि अन्य वस्तूंचा परिवहन खर्च कमी करण्यासाठी इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशनने (आयपीआरसीएल) अन्य यंत्रणांच्या सोबतीने १८,७९५ कोटींची विकास योजना आखली आहे. आयपीआरसीएल हा बंदर तथा रेल्वे विकास मंडळाचा (आरव्हीएनएल) संयुक्त उपक्रम आहे. सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला योजनेंतर्गत रेल्वेला बंदर क्षेत्रातील प्रमुख परिवहन साधनाच्या स्वरूपात विकसित करण्यासाठी बनविलेली विशेष शाखा आहे. जहाज बांधणी मंत्रालयाने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, सागरमाला अंतर्गत ५०पेक्षा अधिक योजनांची सध्या आयपीआरसीएलद्वारे निगराणी केली जात आहे.
७० योजनांची रूपरेषा निश्चित
या अहवालात म्हटले आहे की, ४,२४७ किमीच्या ७० रेल्वे योजनांची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. या योजनांवर ४६,७२८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनांपैकी सध्या १,९६७ किमीच्या २७ योजनांवर १८,७९५ कोटी रुपये खर्च केले जात असून, त्यांचे काम सुरू आहे.