35 मुलांनी भरलेल्या स्कुल बसचा अपघात; कुणाचा हात मोडला, तर कुणाच्या डोक्याला मार लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 06:52 PM2021-11-01T18:52:03+5:302021-11-01T18:52:10+5:30
जखमींमध्ये 6 ते 15 वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
अमेठी:उत्तर प्रदेशातीलअमेठी जिल्ह्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. मुलांनी भरलेली बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली. या अपघातात बसमधील अनेक मुले जखमी झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेठीमधील कोतवाली परिसरातील कुशीतली गावाजवळ हा अपघात झाला. डीआर पब्लिक स्कूलची बस बाराम्सी चौकातून गौरीगंजच्या दिशेने मुलांना घेऊन जात होती. वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस एका झाडावर आदळून पलटली. अपघातानंतर मुलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजुबाजूचे लोक जमा झाले आणि मुलांना रुग्णालयात नेले. या घटनेत काही मुलांचे हात-पाय मोडले, तर काहींच्या डोक्याला मार लागला.
अपघाताच्या वेळी बसमध्ये 35 हून अधिक मुले बसली होती. घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जखमींमध्ये 6 ते 15 वयोगटातील मुलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच संतप्त पालकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. तसेच, अमेठीचे जिल्हा दंडाधिकारी अरुण कुमार हेही जिल्हा रुग्णालयात पोहोचले. मुलांच्या तब्येतीची माहिती घेत डीएमनी चांगले उपचार करण्याचे निर्देश दिले. डॉक्टर डॉ. पितांबर कनोजिया आणि डॉ. नीरज वर्मा यांनी जखमी विद्यार्थ्यांवर उपचार केले. जखमी मुलांचे एक्स-रे आणि सीटी स्कॅनसह इतर तपासण्या करण्यात आल्या. आवश्यक औषधोपचार झाल्यानंतर मुलांना घरी पाठवण्यात आले.