शाळेला उशीर होतोय, मोदीजी लक्ष द्या !
By admin | Published: October 15, 2015 02:21 AM2015-10-15T02:21:03+5:302015-10-15T02:21:03+5:30
रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन शाळेत पोहोचण्यात होणाऱ्या विलंबाकडे तिसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षांच्या
बेंगळुरू : रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम रखडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन शाळेत पोहोचण्यात होणाऱ्या विलंबाकडे तिसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षांच्या चिमुकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलने पत्र पाठवून लक्ष वेधले आणि काय पंतप्रधान कार्यालयानेही(पीएमओ) लागलीच आदेश पाठवत कारवाई सुरू केली आहे. वायव्य जंक्शनवरील वाहतुकीची कोंडी हजारो वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याकडे एका विद्यार्थ्याने लक्ष वेधल्यानंतर पीएमओनेही संवदेनशील प्रतिसाद देत रेल्वेला या प्रश्नात लक्ष घालण्याचा आदेश दिला.
गोरागुंटेपल्या जंक्शनजवळील रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात येत असलेल्या फ्लायओव्हरमुळे वाहतुकीची कोंडी दैनंदिन झाली आहे. परिणामी विद्यारण्यापुरा येथे राहणाऱ्या अभिनव नावाच्या या मुलाला यशवंतपूर येथील नॅशनल पब्लिक स्कूल या त्याच्या तीन कि.मी. अंतरावरील शाळेत पोहोचण्यासाठी ४५ मिनिटांचा अवधी लागतो. संरक्षण मंत्रालयाकडून निधी मिळण्यास विलंब झाल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. वाहनांच्या प्रदूषणामुळे केवळ लोकांच्या प्रकृतीवरच नव्हे तर माझ्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे, असे अभिनवने पत्रात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)