बापरे! झेंडावंदन करून 'ती' शाळेतून निघाली पण घरी आलीच नाही कारण...; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 08:50 PM2022-08-15T20:50:03+5:302022-08-15T20:51:01+5:30
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थिनी घरी परतत होती.
नवी दिल्ली - देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला आहे. पण याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. झेंडावंदन करून शाळेतून घरी परतणाऱ्या एका विद्यार्थिनीला बसने चिरडलं. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थिनी घरी परतत होती. त्याचवेळी बसने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बस ड्रायव्हरला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार. लक्ष्मीश्री असं विद्यार्थिनीचं नाव असून ती नेलिमिचेरी परिसराची रहिवासी आहे. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर लक्ष्मीश्री तिच्या मैत्रिणीसह सायकलवरून घरी परतत होती. त्यावेळी सरकारी बसने लक्ष्मीश्रीला चिरडलं. बसने मागून धडक दिली. त्यामुळे लक्ष्मीश्रीचा तोल गेला. ती बसच्या मागच्या चाकाखाली आली. जागीच तिचा मृत्यू झाला.
संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामध्ये दोन मुली सायकलवरून जाताना दिसत आहेत. त्यांच्या मागून बस येते. ती एका मुलीला चिरडते, असा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातानंतर बसच्या चालकानं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी आरोपी चालकावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन स्थानिकांना दिलं. रस्त्याच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांमुळे असे अपघात होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. रस्त्याजवळची अतिक्रमणं आणि पार्किंग करण्यात आलेली वाहनं हटवल्यास अपघात टाळता येतील असं स्थानिकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.