"या" शाळेत गेल्या तीन वर्षात एकही विद्यार्थी पास झाला नाही दहावीची परीक्षा
By admin | Published: June 1, 2017 12:07 PM2017-06-01T12:07:21+5:302017-06-01T12:08:55+5:30
शिक्षक मात्र कर्मचा-यांची कमतरता असल्यानेच व्यवस्थित लक्ष देणं कठीण जात असल्याचं सांगत आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
जिंद, दि. 1 - दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा. दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावी यासाठी विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करत असतात. मात्र आधीच खराब रेकॉर्ड असलेल्या हरियाणा सरकारसाठी जिंदमधील परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी ठरत आहे. जिंद जिल्ह्यातील सरकारी शाळेत गेल्या तीन वर्षात एकही विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेला नाही. यासाठी शिक्षकांना जबाबदार धरलं जात असताना, शिक्षक मात्र कर्मचा-यांची कमतरता असल्यानेच व्यवस्थित लक्ष देणं कठीण जात असल्याचं सांगत आहेत.
मात्र सलग शून्य निकाल येत असल्याने जिल्हा शिक्षण अधिका-याने दखल घेत यासाठी जबाबदार असणा-या शिक्षकांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
जिंदमधील सिल्लाखेडी येथील सरकारी शाळेत एकूण 20 विद्यार्थी दहावीत शिकत होते. हे सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या शाळेत सगळेच विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वेळा संपुर्ण वर्ग अनुत्तीर्ण झाला आहे. 2015-16 रोजी दहावीत 15 विद्यार्थी शिकत होते. हे सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. त्याआधी 2014-15 मध्ये दहावीत एकूण 22 विद्यार्थी होते. यामधील एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकला नव्हता.
शिक्षक व्यवस्थित शिकवत नसल्याने आम्ही अनुत्तीर्ण होत असल्याचं विद्यार्थी सांगत आहेत. तर काही विद्यार्थी शिक्षकांची कमतरता असल्याचं सांगत आहेत.
"शाळेत शिक्षकांची संख्या कमी असून सात जागा रिक्त आहेत. विज्ञान आणि हिंदीचा एकही शिक्षक नसल्याने दोन्ही विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असून निकाल शून्य येत आहे. जर रिक्त जागा भरल्या असत्या तर निकाल चांगला आला असता", असा दावा शाळा प्रशासन करत आहे.
"सरकारी शाळांवर लाखो रुपये सरकार खर्च करते. शिक्षकांनाही चांगला पगार मिळतो. यानंतरही जर संपुर्ण वर्ग अनुत्तीर्ण होत असेल तर शिक्षकांसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. यासंबंधी आपण सरकारला पत्र लिहिणार आहे", असं सरपंच अंगूरी देवी यांनी सांगितलं आहे.