केरळमधील 'या' शाळेने 102 वर्षांपूर्वीच जाहीर केली होती मासिक पाळीची सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 03:27 PM2017-08-21T15:27:12+5:302017-08-21T15:52:43+5:30
शाळेने वार्षिक परिषेदरम्यान मासिक पाळी आली असल्यास विद्यार्थिनींना सुट्टी घेऊन नंतर परिक्षा देण्याची सवलत दिली होती
तिरुअनंतपुरम, दि. 21 - एकीकडे देशभरात मासिक पाळीदरम्यान सुट्टी द्यायची की नाही यावरुन वाद-विवाद सुरु असताना केरळमधील एका शाळेने 100 वर्षापुर्वीच आपल्या विद्यार्थिनींना ही सुविधा दिली असल्याचं समोर आलं आहे. एर्नाकुलम जिल्ह्यामधील त्रिपुनिथुरा येथील सरकारी कन्या विद्यालयाने 1912 मध्ये विद्यार्थिनींसाठी ही सुविधा सुरु केली होती. शाळेने वार्षिक परिषेदरम्यान मासिक पाळी आली असल्यास विद्यार्थिनींना सुट्टी घेऊन नंतर परिक्षा देण्याची सवलत दिली होती.
इतिहासकार पी भास्करानुन्नी यांनी लिहिलेल्या 'केरळ - इन द नायन्टीन्थ सेंच्युरी' पुस्तकात यासंबंधीचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या मुख्याध्यापकांनी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करत मासिक पाळी सुट्टी मंजूर करण्याची विनंती केली होती. मासिक पाळीदरम्यान अनेकदा शिक्षिका आणि विद्यार्थिनी अनुपस्थित राहत असल्याने ही विनंती करण्यात आली होती.
पुस्तकात सांगण्यात आलं आहे की, 'नियमानुसार विद्यार्थ्यांना परिक्षेला बसायचं असेल तर 300 दिवस उपस्थित असणं गरजेचं होतं. परिक्षा नियमितपणे होत असल्याने त्याला हजर राहणं विद्यार्थ्यांसाठी अनिवायर्य होतं. मात्र त्रिपुनिथुरा येथील सरकारी कन्या विद्यालयालातील शिक्षिका आणि विद्यार्थिनी मासिक पाळीदरम्यान शाळेत उपस्थित राहत नसल्याने मुद्दा चर्चेत आला होता.
अनुपस्थितीची वाढता आकडा पाहता मुख्याध्यापक व्ही पी विनाथ अय्यर यांनी वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करत हा मुद्दा मांडला होता. 19 जानेवारी 1912 रोजी त्यांनी हा प्रश्न मांडला होता. पुस्तकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, अधिका-यांनी पुढील पाच दिवसात विनंती मान्य करत विद्यार्थिंनी आणि शिक्षिकांच्या बाजूने निर्णय घेत मासिक पाळीदरम्यान सुट्टी घेण्याची संमती दिली होती.
मासिक पाळीबद्दल थोडक्यात माहिती -
मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी थोडी अगोदरही सुरु होऊ शकते. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यामुळे महिलेला आई बनता येते. पण हेच चक्र बिघडले तर? पाळी मागे-पुढे झाली तर अनेकांना काळजी वाटते. पाळी उशिरा येण्यामागेही काही महत्वाची कारणे असतात. यामध्ये लठ्ठपणा, तणाव, वजन कमी होणे, प्रजनन नियंत्रण, थायरॉईड, गर्भधारणा या कारणांमुळे पाळी उशिरा येऊ शकते हे लक्षात घेतलं पाहिजे.