शाळेच्या नाटकात गोडसे साकारणारा विद्यार्थी संघाच्या गणवेशात; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 09:42 AM2019-10-05T09:42:23+5:302019-10-05T09:43:21+5:30
स्वयंसेवकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
भोपाळ: गांधी जयंतीला एका शाळेत सादर करण्यात आलेल्या नाटकामुळे चांगलाच गदारोळ झाला आहे. गांधींच्या जीवनावर आधारित नाटकात त्यांच्या हत्येचा प्रसंग होता. त्यात गांधींवर गोळ्या झाडणारा नथुराम गोडसेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात दाखवण्यात आला. त्यामुळे संघाचे स्वयंसेवक संतप्त झाले असून त्यांनी या प्रकरणी मानहानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
जबलपूरच्या एका शाळेत गांधी जयंतीला एक नाटक सादर करण्यात आलं. यामध्ये गांधीच्या आयुष्यातील अनेक घटनांचा समावेश होता. यापैकी गांधी हत्येच्या प्रसंगाचा फोटो सोशल मीडियावर आल्यानं गदारोळ झाला. नाटकात नथुराम गोडसेंची भूमिका साकारणारा विद्यार्थी संघाच्या गणवेशात होता. संघाच्या गणवेशात असलेल्या विद्यार्थ्यानं महात्मा गांधींवर गोळा झाडल्या.
याप्रकरणी संघाचे पदाधिकारी असलेल्या यतिंद्र उपाध्याय यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लॉर्डगंज पोलिसांनी संबंधित शाळेविरोधात एनसीआर दाखल केला. उपाध्याय यांनी काल जबलपूरच्या पोलीस अधीक्षक अमित सिंह यांची भेट घेतली. गांधींच्या हत्येमागे संघाचा हात होता, अशी अप्रत्यक्ष शिकवण शाळेकडून विद्यार्थ्यांना दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोडसेंना संघाच्या गणवेशात दाखवण्यात आल्यानं गुन्ह्याचा कट रचल्याचं कलम लावू शकत नसल्याचं पोलीस अधीक्षक अमित सिंह यांनी उपाध्याय यांना सांगितलं. तुम्हाला मानहानीचा दावा दाखल करायचा असल्यास स्थानिक न्यायालयात जाऊ शकता, असंदेखील सिंह म्हणाले. या प्रकरणी माध्यमांनी उपाध्याय यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. हिंदू सेवा परिषद या उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या सदस्यांनीदेखील काल पोलीस अधीक्षकांची भेट घेत शाळा आणि शिक्षकांची तक्रार केली.