शाळा विकणे आहे! देशातील हजार शाळांना कोरोना साथीचा फटका, शिक्षण क्षेत्राची दैन्यावस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 05:33 AM2020-09-20T05:33:47+5:302020-09-20T05:34:31+5:30
देशातील शिक्षण क्षेत्रातील सद्य:स्थितीबद्दलची माहिती सेरेस्ट्रा व्हेंचर्स या संस्थेने गोळा केली आहे. त्याच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
हैदराबाद : कोरोना साथीमुळे देशातील इतर क्षेत्रांबरोबरच शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे देशातील सुमारे एक हजार शाळांच्या इमारती त्यांच्या संचालकांनी विकायला काढल्या आहेत. त्यातून येत्या दोन ते तीन वर्षांत ७५०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
देशातील शिक्षण क्षेत्रातील सद्य:स्थितीबद्दलची माहिती सेरेस्ट्रा व्हेंचर्स या संस्थेने गोळा केली आहे. त्याच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विकायला काढलेल्यांपैकी बहुतेक शाळा खासगी असून, तिथे कमाल वार्षिक फी ५० हजार रुपये होती. या शाळांत केजी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालतात. देशात ८० टक्के शाळा या खासगी आहेत.
सेरेस्ट्रा व्हेंचर्सचे भागीदार विशाल गोयल यांनी सांगितले की, खासगी शाळांनी एखाद्या विद्यार्थ्याकडून ५० हजार रुपयांपेक्षा जास्त वार्षिक फी घेऊ नये अशी मर्यादा सरकारने घालून दिली होती. मात्र, या शाळांना शिक्षकांचे पगार द्यावे लागतात. शाळेचे व्यवस्थापन करताना इतर अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात. या भारामुळे सुमारे हजार शाळांचे अस्तित्व याआधीच पणाला लागले होते. कोरोना साथीमुळे शाळांसमोरील संकटात भरच पडली. त्यामुळे अनेक संचालकांना शाळेची इमारत विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
गोयल म्हणाले, शाळा चालविणाऱ्यांना कर्जे देण्यास बँका नाखुश असतात. कोरोनाच्या साथीमुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक शाळांना आपले अस्तित्व टिकेल का याची चिंता आहे. काही खासगी शाळांनी आपल्या शिक्षकांचे पगार ७० टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत.
महाराष्ट्रातील शाळाही
महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकमध्ये २० ते २५ शाळा खरेदीदारांच्या शोधात आहेत. आॅक्रिज्ड इंटरनॅशनल हा साखळी शाळासमूह हाँगकाँगच्या नॉर्थ अँग्लिया एज्युकेशन या संस्थेने २०१९ मध्ये १६०० कोटी रुपयांना विकत घेतला होता. मात्र, आता विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शाळांच्या इमारतीच्या किमतीत ३० ते ४० टक्के घट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.