शालेय मुलीचा असाही आग्रह, खुद्द मुख्यमंत्र्यांनाही टाळता आला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 06:31 PM2022-05-09T18:31:39+5:302022-05-09T18:33:29+5:30
Bhupesh Baghel arranges a helicopter tour : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने गेल्या गुरुवारी एक महत्वाची घोषणा केली आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी गेल्या गुरुवारी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दहावी आणि बारावीच्या टॉपर्सना मोफत हेलिकॉप्टर राईड देणार असल्याचे भूपेश बघेल यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना सवाल करत हेलिकॉप्टरने जाण्याचा आग्रह धरला. यानंतर मुख्यमंत्र्यांनाही तिचा आग्रह टाळता आला नाही.
छत्तीसगडमधील रघुनाथ नगर (Raghunath Nagar) येथील स्वामी आत्मानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या स्मृती या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 'मी हेलिकॉप्टरमध्ये कधी बसणार' असा सवाल केला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, बारावीत टॉप झाल्यावर तुला हेलिकॉप्टरमध्ये बसवले जाईल. मात्र यावर आज मला तुमच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसायचे आहे, असा आग्रह करत स्मृती मुख्यमंत्र्यांसमोर आडून बसली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही तिचा हट्ट टाळता आला नाही आणि त्यांनी आजच तुम्हाला हेलिकॉप्टरमध्ये बसवतो, असे सांगत स्मृती आणि इतर विद्यार्थिंनीसह हेलिकॉप्टर राईड केली.
दरम्यान, देशभरातील विविध राज्यांमधील दहावी, बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने गेल्या गुरुवारी एक महत्वाची घोषणा केली आहे. बोर्डाच्या परीक्षेतील टॉपर्सना राज्य सरकारतर्फे मोफत हेलिकॉप्टर राईड देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विद्यार्थ्यांसाठी ही मोठी घोषणा केली असून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दहावी आणि बारावीच्या टॉपर्सना मोफत हेलिकॉप्टर राईड देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल पुढील १५ दिवसांत कधीही जाहीर केले जाऊ शकतात. छत्तीसगड बोर्डाच्या परीक्षेत साधारण साडेसहा लाख उमेदवार बसले होते. यापैकी २ लाख ९३ हजार ६८५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ लाख ८९ हजार ८०८ विद्यार्थी नियमित श्रेणीतील आणि ३ हजार ६१७ विद्यार्थी खासगी आहेत. दुसरीकडे दहावीच्या परीक्षेसाठी ३ लाख ८० हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ७७ हजार ६७७ नियमित तर २ हजार ३६० खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.