दिल्लीत वाढत्या प्रदूषमामुळे शाळा-कॉलेज पुढील आदेशापर्यंत बंद, सरकारी कर्मचाऱ्यांना 100% WFH
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 07:30 PM2021-11-17T19:30:09+5:302021-11-17T19:30:35+5:30
दिल्लीत अग्निशमन दलाच्या मदतीने 372 पाण्याच्या टँकरने 13 हॉट स्पॉटवर पाण्याची फवारणी केली जात आहे.
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून देशाची राजधानी दिल्लीतप्रदूषणाचा विळखा तीव्र झाला आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे सरकारने पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी विभागात 100 टक्के वर्क फ्रॉम होम (WFH) लागू केले आहे. याशिवाय, राजधानीत 21 नोव्हेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी असेल.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या प्रदूषणामुळे राजधानीत अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व प्रकारच्या ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून दिल्लीत 1000 CNG खाजगी बसेस भाड्याने घेतल्या जाणार आहेत. मेट्रो आणि बसमध्ये प्रवास करण्यासाठी डीडीएमएकडून परवानगी मागितली आहे.
गोपाल राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील 10-15 वर्षे जुन्या वाहनांची यादी दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आली असून, वाहनांच्या प्रदूषण प्रमाणपत्राची कसून चौकशी केली जाईल. दिल्लीत अग्निशमन दलाच्या मदतीने 372 पाण्याच्या टँकरने 13 हॉट स्पॉटवर पाण्याची फवारणी केली जात आहे. याशिवाय, दिल्लीत गॅसशिवाय इतर सर्व प्रकारच्या उद्योगांवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यन, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरुन सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आणि आसपासच्या भागातील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेबद्दल केंद्र आणि दिल्ली सरकारची खरडपट्टी काढली आहे.