कोरोनाची धास्ती! शाळांना पुन्हा टाळे; 20 डिसेंबर ते 07 जानेवारी 2022 पर्यंत सुटी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 04:49 PM2021-12-18T16:49:29+5:302021-12-18T16:51:04+5:30
Schools closed : शहरातील सर्व शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांना 20 डिसेंबर ते 07 जानेवारी 2022 पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे.
चंदीगड : कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता चंदीगडच्या शिक्षण विभागाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने म्हटले आहे की, मुलांना कोरोना संक्रमण होण्याच्या वाढत्या धोक्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे, त्यासाठी ऑफलाइन शिक्षण काही काळासाठी थांबविले जाईल.
शहरातील सर्व शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांना 20 डिसेंबर ते 07 जानेवारी 2022 पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने हिवाळी सुट्टीचे वेळापत्रक बदलून सोमवार 20 डिसेंबरपासून शाळा बंद केल्या आहेत. दरम्यान, पहिल्यांदा हिवाळी सुट्टी 27 डिसेंबर ते 05 जानेवारीपर्यंत असल्याने ही मुदत वाढवण्यात आली आहे.
18 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. 2 महिने सर्व वर्ग सुरू केल्यानंतर आता पुन्हा शाळा बंद करण्यात येत आहेत. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच शाळा उघडण्यात आल्या होत्या. मुलांना त्यांच्या पालकांच्या संमतीनेच शाळेत येण्याची परवानगी होती. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अभ्यास सुरू होता.
दरम्यान, गेल्या आठवड्यात चंदीगडमध्ये आढळून आलेली संक्रमणाची 126 नवीन प्रकरणे जुलै महिन्यानंतर सर्वाधिक होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एका आठवड्यातील संसर्गाची ही सर्वाधिक संख्या होती. अशा परिस्थितीत संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने शाळांना पुन्हा टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आता 07 जानेवारी 2022 नंतरच शाळा पुन्हा सुरू होऊ शकतील.
ओमायक्रॉनमुळे भीतीचे वातावरण
देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील रुग्णसंख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,145 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 289 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,77,158 लोकांना गमवावा आपला जीव लागला आहे. देशात आता ओमायक्रॉनमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.