१२ राज्यांत शाळा उघडल्या; ६ राज्यांत मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 07:24 AM2021-09-03T07:24:17+5:302021-09-03T07:24:25+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू होऊन सुमारे एक महिना उलटला आहे.
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दीड वर्षानंतर देशात काही राज्यांनी शाळा सुरू केल्या आहेत. १२ राज्यांमध्ये शाळा उघडल्यापासून मुलांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात, आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पुन्हा एकदा कोविड नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्हा प्रशासनाला शाळांवर लक्ष ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू होऊन सुमारे एक महिना उलटला आहे. यामध्ये पंजाब अव्वल आहे कारण तिथे सर्वांत आधी शाळा सुरू झाल्या. यानंतर बिहारमध्ये १५ ऑगस्टनंतर शाळा सुरू झाल्या. दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडमध्येही मुले शाळेत जाऊ लागली आहेत.
गेल्या दोन महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसते की, १७ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये काही ठिकाणी संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. पंजाब, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्ये ही वाढ एक टक्क्याहून अधिक आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी झाले
आहे.